उरणमध्ये उपसरपंच निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षात चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 09:51 PM2022-12-28T21:51:51+5:302022-12-28T21:52:20+5:30
उपसरपंच निवडणुकीत उमेदवारांना समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असणार आहे.
मधुकर ठाकूर
उरण - तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका सोमवारी (२) होणार आहेत. या निवडणूकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
उरण तालुक्यातील बोकडवीरा, नवघर,भेंडखळ, नवीन शेवा,डोंगरी,पाणजे,करळ, जसखार,पागोटे, पिरकोन, सारडे, वशेणी,कळंबूसरे,धुतुम,चिर्ले,पुनाडे व घारापुरी या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या आहेत. थेट जनतेतून सरपंच पदाची निवड झाली आहे. मात्र उपसरपंच हे निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. त्यासाठी ज्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांच्याकडे सदस्याचे बहुमत नाही. अशा ग्रामपंचायतीत बहुमत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्येच चढाओढ लागली असुन जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
उपसरपंच निवडणुकीत उमेदवारांना समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असणार आहे. त्यामुळे थेट निवडून आलेल्या सरपंचाना दोन मतांचा अधिकार बजावता येणार आहे. या निवडणूकांच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे उपसरपंचपदासाठी २ जानेवारी २०२३ ला मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.