लोकमत न्यूज नेटवर्कश्रीवर्धन : मनुष्य आणि समाज याचे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. मात्र कोरोना विषाणूने मनुष्याला समाजापासून दूर नेल्याचे दिसून येते. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन कोणत्याही समाजात अंत्यविधी, श्राद्ध यांना अतिशय महत्त्व आहे. श्राद्ध न घातल्यास स्वर्गातील पूर्वजांना त्रास होतो किंबहुना ती आपणास त्रास देतात अशा विविध कल्पना अनेक समाजात आहेत मात्र या सर्व कल्पनांना, या विचारांना कोरोनाने काही काळासाठी तरी गायब केल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी श्रीवर्धन शहरातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झाला. संबंधित वयोवृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नगरपालिका प्रशासनाला स्मशानभूमीकडे मार्गक्रमण करावे लागले. रात्रीच्या गडद अंधारात श्रीवर्धन नगरपालिकेच्या रुपेश श्रीवर्धनकर , प्रसाद डोंगरे, अमर गुरव, प्रल्हाद पडवळ, अजित श्रीवर्धनकर, प्रसाद कडू , गौरव बोरकर आणि मुख्याधिकारी किरणकुमार मोरे या कर्मचाऱ्यांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे सरण रचले. ना समाज, ना नातेवाईक शेवटच्या क्षणाला अग्नि देणारा फक्त मुलगा व त्याचा एक मित्र आणि नगरपालिकेचे कर्मचारी असे मनाला चटका लावणारे भयानक दृश्य श्रीवर्धनच्या स्मशानभूमीत निदर्शनास आले.