मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या अनेक पोलीस चौक्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वापराविना पडून आहेत.
मुंबई शहरावर अतिरेकी हल्ला हा समुद्र मार्गाने झाला होता.त्यामुळे मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्तांनी बोकडविरा, दिघोडे, दिघाटी, घारापुरी,उलवे, वशेणी, पीरवाडी , ओएनजीसी रोड आदी ठिकाणी पोलीस चौक्या उभारल्या आहेत.
मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक पोलीस चौक्या बंद पडल्या आहेत.कंटेनरमध्ये सुरू करण्यात आलेल्या पोलिस चौक्या सडून गेल्याने काही चौक्याची पार दूरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलीस चौक्याच लुप्त झाल्याने गुन्हेगारी रोखणार तरी कशी असा सवाल जनमानसात सध्या विचारला जात आहे. दरम्यान पोलिस चौक्यासाठी आवश्यक पोलिस बळ उपलब्ध नाही.सोयीसुविंधांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळेच पोलिस चौक्या बंद असल्याची माहिती पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिली.