महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:30 AM2023-11-23T07:30:34+5:302023-11-23T07:31:17+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीवरून शिंदे गट-भाजपत संघर्षाची ठिणगी

All three parties in the alliance claim the Raigad Lok Sabha seat | महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा

महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) असलेल्या रायगड मतदारसंघावर आधी भाजप आणि आता शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते मात्र या वादापासून तूर्त दूर आहेत.

त्यातच अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाने पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. पंचायत निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी युती होती. मात्र, भाजपने अनेक ग्रामपंचायती स्वबळावर लढवल्या. शिंदे गटाकडून लढविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे करून शिंदे गटासमोर पर्यायाने आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आव्हान उभे केले. भाजपच्या या खेळीने शिंदे गटाला तीनच ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला, तर बाकी ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अलिबागमध्ये आले असताना त्यांनी रायगडाच्या खासदारपदावर दावा केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपच्या या खेळीने मित्र पक्ष शिंदे गटाला मात दिली. 

भाजपने सुधारावे, अन्यथा... 
 शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार होरीजन सभागृहात झाला. यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचे खापर भाजपवर फोडले. 
 भाजपने सुधारावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. रायगडची लोकसभेची जागा शिवसेनेची असल्याचा दावाही दळवी यांनी केला. 

टीका करताना भान राखा
ग्रामपंचायतीत काही ठिकाणी आम्ही युतीत लढलो, तर काही ठिकाणी स्वबळावर लढलो. जिथे सोबत होतो तिथे शिंदे गटाला यश मिळाले. आम्ही प्रामाणिक राहिलो. आमचे काम ए टीमचेच आहे. त्यामुळे भाजप किंवा पदाधिकारी, नेते यांच्यावर टीका करताना भान ठेवा, असे प्रत्त्युत्तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी दिले.

Web Title: All three parties in the alliance claim the Raigad Lok Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.