कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रीटकरण करून केली जाणार आहेत. मात्र शहापूर-मुरबाड-खोपोली या मार्गावरील दोन्ही ठिकाणी मंजूर असलेली कामे सध्या बंद आहेत. तर कर्जत-कल्याण रस्त्यावरील काम देखील बंद असल्याने ऐन पावसाळ्यात सर्वांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील मुरबाड या राज्यमार्ग रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा दिला आहे. त्यामुळे शहापूरपासून मुरबाड आणि कर्जत होऊन खोपोली असा नवीन राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचे काँक्रीटकरण करण्यासाठी तब्बल ८०० कोटीचे टेंडर मंजूर आहे. कर्जत तालुक्यातील कामे दोन टप्प्यात होत असून५३ किलोमीटर अंतराचे काम मंजूर असून ते मागील सहा महिन्यांपासून सुरू झाले होते. त्यात ठाणे जिल्हा हद्दीमध्ये तसेच कर्जत तालुका हद्दीपासून कामे सुरू असून कशेळे भागात देखील मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात झाली होती. तर कर्जतच्या भिसे खिंडीपासून पुढे खोपोलीपर्यंत भागात सिमेंट काँक्रीटकरण करण्याचे काम सुरू केले होते. हे सर्व सुरळीत पावसाळ्यापूर्वी सुरू होते, मात्र कर्जत तालुक्यात या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन महिन्यापासून कामाची गती थंडावली आहे. त्यात पावसाने जोर धरल्याने तर राज्य रस्ते विकास महामंडळ बांधकाम करीत असलेल्या शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली रस्त्यावरील कामे बंद पडली आहेत. मात्र काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने खोदकाम के ले असून रस्त्याची कामे रखडली आहेत त्यापेक्षा भयंकर आहे. कारण जागोजागो वळणे कमी करण्यासाठी आणि चढण कमी करण्यासाठी खोदकाम केले गेले आहे. हे खोदकाम करीत असताना कुठेतरी काँक्रीटचा रास्ता ५०-१००मीटर अंतराचा लागतो आणि पुन्हा खड्डेमय रस्ता सुरू होतो. त्यामुळे खोदलेला रस्ता कुठे संपतो आणि काँक्रीटचा रस्ता कधी सुरू होतो हे कळून येत नाही. परिणाम वाहने रस्त्यावर आदळत असून गाडीचे टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.
ही स्थिती शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या पट्ट्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी वाहनचालक अनुभवत आहेत. तर खोपोली भागाकडे जाणाºया रस्त्यावर पळसदरी भागात अशीच स्थिती राज्य रस्ते विकास महामंडळाने करून ठेवले आहे. त्या भागात तर वाहतूक देखील फार अल्प प्रमाणात असते, अशावेळी एका पूर्ण लेनमध्ये रस्त्याचे काम करण्याची संधी असताना देखील ठेकेदार कंपनीकडून रस्त्याचे काम एकसंघ सुरू नाही. जून महिन्यापासून त्या भागात देखील काँक्रीटची कामे करण्यासाठी आणलेल्या मशिनरी उभ्या करून ठेवल्या आहेत. त्याचवेळी अनेक मशिनरी यांना तर पावसाच्या पाण्यात यंत्र खराब होऊ नये म्हणून झाकून देखील ठेवल्या आहेत.कर्जत तालुक्यातील कामे करण्यासाठी दोन भागात वेगवेगळे ठेकेदार काम करीत आहेत. रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचे काम बंद असेल पण अन्य कामे सुरू आहेत. - एस. के. गोसावी, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळराज्य रस्ते विकास महामंडळ यांचे कार्यालय कर्जत तालुका हद्दीत ५३ किलोमीटरचे काम होत असताना देखील कुठेही नाही.त्यामुळे वाहन चालक आणि स्थानिकांना बंद पडलेल्या कामाबद्दल जाब देखील विचारता येत नाही. कर्जत-कल्याण रस्त्यावर ११ किलोमीटर लांबीचा दुपदरी रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. मात्र त्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाले आणि दुसºयाच दिवशी बंद पडले आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर देखील खड्ड्यांतून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे.