अल्प ठेवीदारांना पैसे वाटप
By admin | Published: September 8, 2015 11:38 PM2015-09-08T23:38:29+5:302015-09-08T23:38:29+5:30
गणेशोत्सवापूर्वी पेण अर्बन सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेत जमा असलेल्या ४० कोटी रुपयांपैकी बँकेच्या अल्प ठेवीदारांना मंगळवारपासून पेण अर्बनच्या १८ शाखांमध्ये पैसे वाटप
पेण : गणेशोत्सवापूर्वी पेण अर्बन सहकारी को आॅपरेटिव्ह बँकेत जमा असलेल्या ४० कोटी रुपयांपैकी बँकेच्या अल्प ठेवीदारांना मंगळवारपासून पेण अर्बनच्या १८ शाखांमध्ये पैसे वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. १० हजारांपर्यंतच्या ठेवी असलेले ठेवीदारांची संख्या सुमारे १ लाख ९३ हजारा ४३० असून या अल्प ठेवीदारांना तब्बल १८ कोटी रुपयांचे वाटप होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१० पासून तब्बल साडेचार वर्षे निराशेने ग्रस्त ठेविदारांना आज दिलासा मिळाला. पेण अर्बनच्या १० हजाराच्यावर ते २ कोटीपर्यंत ठेवी असलेले ठेवीदार व पतसंस्था मिळून ५९ हजार ४७३ ठेवीदार आहेत. यांची एकूण ६१४ कोटी रुपये रक्कम वाटप होणे आहे. बँकेत वसूली झालेले ८० कोटीची पैकी प्रथम अल्प ठेविदारांना १८ कोटी रुपयांचे वाटप होत आहे.
ठेविदाराच्या आडनावानुसार वेळापत्रक प्रशासक मंडळाने तयार केले असून ८ ते १२ सप्टेंबरपर्यंत या वाटपाचे नियोजन आहे. यामध्ये ८ सप्टेंबरला इंग्रजी ए ते ई या अक्षराने सुरु होणारे ठेवीदाराच्या आडनावे असलेल्यानाच पैशाचे वाटप बँकेच्या १८ शाखामधून करण्यात आले. ९ सप्टेंबरला एफ ते जे इंग्रजी अक्षरानुसार आडनावे येणारे ठेवीदार. १० तारखेला के ते ओ आक्षराची आडनावे, ११ तारखेला पी ते एस अद्याक्षराची आडनावे असलेले ठेवीदार तर १२ तारखेला टी ते झेड आद्याक्षराची आडनावे असलेले ठेवीदारांना पैशाचे वाटप होणार आहे.
पैसे वाटपासाठीच्या प्रशासकीय मंडळात विजय म्हात्रे, नरेन जाधव, नरेंद्र साखरे, दिनेश चव्हाण, छगन गंडाळ, शरद जरे यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
खोपोलीत ठेवीदार संघर्ष समितीची सभा
खोपोली : पेण अर्बन बँकेकडे परवाना नसतानाही न्यायालयाच्या आदेशानंतर १ लाख ३४ हजार ठेवीदारांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया आजपासून विविध शाखांमध्ये सुरू झाली आहे, हा ठेवीदारांच्या संघर्षाच्या विजयाचा पहिला टप्पा आहे.
गेल्या ५ वर्षातील पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा लढा हा इतिहासात नोंद केला जाईल असा लढा आहे, असे प्रतिपादन संजय केळकर यांनी खोपोलीत केले.पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीची सभा खोपोलीत झाली, त्यावेळी ते बोलत होते.
कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० हजारांपर्यंत ठेवी असणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम १२ सप्टेंबरपर्यंत सर्व शाखांमध्ये मिळणार आहे असे सांगून, ठेवीदार, खातेदारांनी आपले ओळखपत्र दाखवून, आपले धनादेश घेवून जाण्याचे आवाहन केले.