२ लाख ५६ हजार जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:52 AM2020-03-03T00:52:37+5:302020-03-03T00:52:41+5:30
रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या द्विवार्षिक अभियानामधून २ लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका योजना २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी दोन वर्षांतून एकदा त्याच्या शेतजमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. २०१७-१८ ते २०१८-१९ या द्विवार्षिक उपक्रमात जिल्ह्यात एकूण २५ हजार ६३३ नमुने काढण्यात आले. त्याद्वारे दोन लाख ५६ हजार ३३० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. २०१९-२०मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली. या १५ गावांतून चार हजार १६४ जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची निवड करून, तेथील मातीनमुने जमा करून जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग येथील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.
जमिनीचे आरोग्य चांगले राहिल्यास माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते. राज्यातील पीक जमिनीपेक्षा रायगड जिल्ह्यातील मातीमध्ये सामू (पीएच) उत्ताम आहे. जिल्ह्यातील पीक जमीन उत्तम असून जमिनीत सेंद्रीयाचे प्रमाण चांगले आहे. आपल्या पुढील पिढीसाठी जमिनीची ही सुपिकता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्याप्रमाणे पिकाचे नियोजन करावे यासाठी शासनामार्फत प्रचार आणि प्रसार सुरू आहे, अशी माहिती रायगड जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी विठ्ठल राठोड यांनी दिली.
>माती परीक्षण का करावे?
माती परीक्षण म्हणजे जमिनीची कमीत कमी वेळात केलेली रासायनिक व भौतिक तपासणी. यात साधारणपणे जमिनीचा सामू (पीएच), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्बन, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, जस्त, तांबे, मंगल आणि बोरॉन या गुणधर्मासाठी मातीचे परीक्षण केले जाते. त्यानुसार या अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण याबाबत माहिती मिळते, त्यानुसार पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा समतोल प्रमाणात करता येतो.
>उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत मिळते
माती परीक्षणानुसार योग्य प्रमाणात सेंद्रीय व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होतेच, पण अन्नद्रव्यांवर होणाºया खर्चात बचत होऊन अधिक फायदा मिळतो. त्याचप्रमाणे जमिनीची सुपीकता कायम टिकविण्यास व तिची उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत होते. जमिनीचा सामू व क्षारता या गुणधर्माच्या मूल्यमापनावरून क्षारयुक्त किंवा खार जमिनीबाबत तात्पुरती कल्पना येऊन त्यानुसार सुधारणा करण्यासाठीही मदत होते; म्हणून माती परीक्षण करून घेणे शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.