महाडमध्ये पूरग्रस्तांना नुकसानभरपाईचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:17 AM2019-08-18T00:17:13+5:302019-08-18T00:17:25+5:30
महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली.
दासगाव : महाड तालुक्यात अतिवृष्टीत घरे आणि पाळीव जनावरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू करण्यात आली आहे. महाडमध्ये ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत मदत वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी दिली. तर भातशेतीचे पंचनामे अद्याप सुरू असून, त्याबाबतचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आल्यानंतर भरपाईचे वाटप होणार आहे.
महाड तालुक्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाची संततधार सुरू होती. यामुळे सखल भागात कायम पाणी साचून राहिले. खाडीपट्टा आणि रायगड विभागातील भात शेतात पुराचे पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. यात भातशेती, घरे आणि पाळीव जनावरांचा समावेश आहे. पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे केले असून त्यानुसार महाड तालुक्यातील ४९ जणांना घरांचे नुकसान झाल्याबाबत दोन लाख २७ हजार ५५० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ही नुकसानभरपाई संबंधित नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे पुरात मरण पावली आहेत. या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात आली असून, संपूर्ण तालुक्यात सहा लाख २२ हजार रुपयांची मदत आतापर्यंत वाटप झाली आहे. विन्हेरे गावातील मंगेश रामभाऊ विसापूरकर या मयत व्यक्तीच्या नातेवाइकांना तत्काळ मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सदर व्यक्ती महाड तालुक्यातील असून खेडमध्ये पुरात मयत झाल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले.
महाड तालुक्यात शेतीचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. हे पंचनामे कृषी विभाग, महसूल आणि पंचायत समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने सुरू आहेत. याबाबतही लवकरच मदत प्राप्त होईल, असेही तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी सांगितले. महाड तालुक्यातील बहुतांश भागात सलग सात ते आठ दिवस पुराचे पाणी शेतात साचून राहिले. अतिवृष्टीत भाताची रोपे वाहून जाणे, शेतात माती येऊन नुकसान झाले आहे. तालुक्यात तसेच शहरात अनेक घरात तसेच दुकानांत पुराचे पाणी शिरले. मात्र, याबाबत शासन निर्णयात बसत नसल्याने मदतीस विलंब होत आहे.
भेलोशी शिक्षण मंडळाची मदत
सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी महाडमधील भेलोशी पंचक्रोशी शिक्षण मंडळाकडून मदतीचा २५ हजारांचा धनादेश महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.