निविदा येण्याआधीच कामाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:03 AM2017-08-03T02:03:06+5:302017-08-03T02:03:06+5:30
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच कामांचे वाटप होऊन कामांना सुरु वात झाली आहे.
अलिबाग : अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच कामांचे वाटप होऊन कामांना सुरु वात झाली आहे. ठेकेदार आणि अधिकाºयांच्या संगनमताने हा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी केला. बुधवारी जोग यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून या सर्व प्रकाराची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० जुलै रोजी, ‘रस्त्यांचे खड्डे बुजविण्याच्या कामाची निविदा’ प्रसिध्द झाली आहे. त्यात ८आॅगस्ट २०१७ पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. त्या ११ आॅगस्ट २०१७ ला उघडण्यात येवून त्यानंतर त्याच्या वर्कआॅर्डर्स देण्यात येणार आहेत. परंतु प्रत्यक्ष निविदा नोटीस प्रसिध्द होण्यापूर्वीच जबाबदार अधिकारी व ठेकेदारांनी मिळून ही कामे आपसांत वाटून घेवून प्रत्यक्ष कामे सुरू केली आहेत. याबाबत २६ जुलै रोजीच लेखी तक्र ार केली असल्याचे जोग यांनी सांगितले. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच जे.सी.बी. ट्रक भाड्याने घेणे, मटेरियल जमवून ठेवणे, मजूर दैनंदिन तत्त्वावर घेणे याची निविदा काढणे शक्य होते, पण आपण वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खड्डे भरण्याची कामे ही निकृष्ट दर्जाची करणाºया ठेकेदारांनाच पुन्हा दिली आहेत. कोणतीही देखरेख नसताना, निकृष्ट व चुकीचे मटेरियल वापरून कामे केली जाणार आहेत, बिले काढली जाणार आहेत. कामांवर कधीच माहितीचे फलक लावले जात नाहीत. खोटी मेजरमेंट रेकॉर्ड केली जातात, असेही जोग यांनी निवेदनात म्हटले आहे.
आता निविदा प्रसिध्द होण्यापूर्वीच कामांची सुरु वात कशी झाली? रस्त्यांवर अधिकाºयांच्या संमतीशिवाय दगड-खडी टाकणे, रोलिंग करणे, जे.सी.बी.ने कामे करण्याचे प्रकार कसे सुरू झाले? असा प्रश्न त्यांनी केला. रेवस, रेवदंडा, रोहा मार्गावर जेसीबी, रोलरने काम केले जात आहे, रस्त्यांवर मटेरिअल टाकले आहे. त्याबाबत जबाबदार अधिकाºयांकडून नाहरकत घेतली जात नाही? या कामांवर सुपरव्हिजन कोण करणार? या कामांचे कोणते साहित्य आहेत? हे कळूच शकत नाही. कारण सर्व कामे अगोदरच वाटून घेतली आहेत. निविदांचा फक्त फार्स केला जात आहे. अधिकाºयांची निकृष्ट कामे करणाºया ठेकेदारांसह हातमिळवणी करून जनतेच्या कररूपी पैशांचा पुन्हा अपहार करीत आहेत. दरवर्षी हेच होत आहे. आता या कामाची रक्कम तीन कोटी सत्तेचाळीस लाख इतकी आहे.