लॉकडाऊनमध्ये शेतीच्या कामांना सूट मिळाल्याने लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:23 AM2020-04-28T01:23:04+5:302020-04-28T01:23:45+5:30
शेतकऱ्यांनी ट्रॅकटरद्वारे शेतातील नांगरणीची कामे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे चित्र पेणमधील ग्रामीण भागात सध्या दिसत आहे.
दत्ता म्हात्रे
पेण : मान्सूनच्या आगमनाला महिनाभराचा अवधी शेष आहे. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी केलेल्या लाकडाउनमुळे शेतीची कामे अडकली होती. आता २० एप्रिलपासून शेतीच्या कामांसाठी लाकडाउनमध्ये सूट देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅकटरद्वारे शेतातील नांगरणीची कामे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे चित्र पेणमधील ग्रामीण भागात सध्या दिसत आहे. शेत नांगरणी ट्रँक्टरद्वारे करण्यावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. त्यामुळे कृषी कामांना यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असून ती कामे लवकर उरकण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत.
पेणमध्ये १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून यातील ५ हजार हेक्टर क्षेत्रातील मशागतीची कामे कोरोनामुळे प्रलंबित राहिली होती. सध्या कृषीविषयक कामांसाठी पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होत असल्याने यांत्रिकीकरणावर शेतकºयांचा भर राहिला आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना येत्या महिनाभरात ही ४० टक्के शेष कामे यांत्रिकीकरण पद्धतीने उरकून वेळ व पैशाची बचत करण्याचा सुलभ मार्ग शेतकºयांनी या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अवलंबलेला आहे.
या वर्षीसुद्धा मान्सून सरासरी १०० टक्के पडणार अशी भविष्यवाणी भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. बरोबर १ जून २०२० रोजी मान्सूनचे आगमन होऊन ७ जूनपासून मान्सून राज्यात स्थिरावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गतवर्षीच्या पावसाने सर्व अंदाज मोडीत काढून सरासरीच्या दुपटीने पाऊस पडून शेतीची धूळधाण उडविली होती. या वर्षी सरासरीइतका पाऊस पडेल या आशावादानेच शेतकरी सुखावला आहे. मात्र कोरोना संसर्गाचा बाहेर धोका आहे, तो रोखण्यासाठी ४१ दिवसांच्या सक्तीच्या लाकडाउनमध्ये २० एप्रिलपासून कृषी क्षेत्रातील कामांसाठी सूट देण्यात आली आहे.
>दरवर्षीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस शेतीची सर्व कामे उरकून शेतकरी बी, बियाणे, खते यांची खरेदी करण्यासाठी मे महिन्यातील दिवस राखून ठेवतो. मात्र या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर ओढावले आणि सगळे जनजीवन घरातच अडकले, ते पुढे किती दिवस अडकून राहणार याबाबत अजून तरी स्पष्ट चित्र दिसत नाही.
>पण नेहमीच येतो पावसाळा, शेतीची कामे लवकरच आवरा या तत्त्वाने हाती राहिलेल्या ३० दिवसांत सर्व कामे लवकर उरकण्यासाठी ट्रँक्टरद्वारे नांगरणी, उखळणीच्या कामांवर अधिक भर दिला जात आहे.