भेटीगाठीसोबतच मदतही आटली; आजी-आजोबा एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:29 AM2021-04-20T00:29:06+5:302021-04-20T00:29:18+5:30
वृद्धाश्रमात सुविधा पुरविताना अडचणी
मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील शांतिवन येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात सध्या २८ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे, मात्र मदतीचा ओघ कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत.
यापूर्वी वृद्धाश्रमात अनेक जण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी या ठिकाणी जात नव्हते, मात्र सद्यस्थितीत कोरोनामुळे कुणीही मदत करण्यासाठीही पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही गेल्या काही महिन्यांपासून भेटीस न आल्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे पनवेलमध्ये दररोज अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक या वृद्धाश्रमाला भेटी देऊन साहित्याच्या स्वरूपात मदत देत असत. मात्र, कोरोनामुळे आता कोणीही येत नाही. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.
वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक या वृद्धाश्रमाला भेटी देऊन साहित्याच्या स्वरूपात मदत देत असत. मात्र, कोरोनामुळे आता कोणीही येत नाही.
या महामारीमुळे माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे. आमच्या कुटुंबीयांचे आमच्या सोबत फोनवर आणि व्हिडिओ कॉलवर बोलणे होते.
- वृद्ध महिला
रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दुःखाची काळजी घेणारे विनायक शिंदे, प्रमोद ठाकूर, नितीन खंबाटी यांच्यासारखे लोक या ठिकाणी आहेत.
- वृद्ध नागरिक पुरुष