‘हापूस’ या वर्षी एक महिना उशिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:16 PM2020-02-26T23:16:23+5:302020-02-26T23:17:20+5:30
उशिरापर्यंत पाऊस लागल्यामुळे कोकणातील सर्वच शेती उत्पन्नावर परिणाम
कार्लेखिंड : फळांचा राजा हापूस आंबा या वर्षी उशिरा मोहोरल्यामुळे एक महिना उशिरा खाण्यास मिळणार. कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते; परंतु या वर्षी उशिरापर्यंत पाऊस लागल्यामुळे कोकणातील सर्वच शेती उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील ७ नोव्हेंबरला जो पाऊस झाला, त्यामुळे त्याचा आंबा मोहोर प्रक्रियेवर परिणाम झाला. या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात ७० टक्के आंबा मोहोर दिसत आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील बाजारातील आवक ही एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे.
सध्या वातावरण चांगले असल्यामुळे आलेला मोहोर उत्तम आहे; यामुळे उत्पन्न चांगले मिळेल; परंतु वातावरणात जर बदल झाला तर आंबा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यावर्षी मे महिन्यात आंबा चांगला मिळेल, असे मत आंबा बागायतदारांचे आहे.