१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:05 AM2021-04-24T01:05:46+5:302021-04-24T01:06:04+5:30

दररोज १२५ हून अधिक कॉल; कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिक बेचैन

Also waiting for 108 ambulances | १०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर

Next



मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आता रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याउपर जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत ६ हजार ३९४ रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचे दिव्य १०८ रुग्णवाहिकेने पार पाडले आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरावरून शासकीय हॉस्पिटलमध्ये तथा खासगी कोविड रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णांना दाखल करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिक बेचैन आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्यासाठी १०८ च्या एकूण २३ रुग्णवाहिका आहेत. रुग्णाने कॉल केल्यानंतर तो पुणे येथील कॉल सेंटरमध्ये जातो. जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेसाठी दररोजचे १२५ च्या आसपास कॉल्स येत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील जवळपास १४ सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील वर्तमान स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या ९७ हजारांच्या घरात गेली असून सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजारांच्या टप्प्यात आली आहे, तर ८२ हजारहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत. त्या तुलनेत रुग्णालयात उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याशिवाय रुग्णांना घेण्यास जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनाही अडचण भेडसावत आहे. रुग्णवाहिकेसाठी जिल्ह्यातून शहरी तथा ग्रामीण भागातून दररोजचे १२५ ते १३० कॉल्स येतात. कोरोनाव्यतिरिक्तही अन्य रुग्णांनाही सेवा द्यावी लागत असल्याने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे शेड्युलही सध्या टाइट झाले आहे. त्यातच जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या ही २३ असून या संपूर्ण रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ४ कार्डियाक रुग्णवाहिकाही असल्याची माहिती अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे समन्वयक संतोष काळे यांनी दिली.
एखाद्या व्यक्तीने १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यास त्यांना तत्काळ रिस्पॉन्स दिला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कधी कधी तासभर तर कधी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. परिस्थिती कशी आहे, रुग्ण जास्त असले आणि एकाच वेळी रुग्णवाहिकांची मागणी वाढली तर रुग्णवाहिका पोहोचायला उशीर होतो. परिणामी चालकांना अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरेदेखील जावे लागते. कधी कधी तर २० मिनिटांच्या आतच रुग्णवाहिका रुग्णाच्या जवळ पोहोचते तर कधी उशीर लागतो. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी लावलेल्या रुग्णवाहिका उशिरा पोहोचत आहेत.
कोविडच्या काळात १०८ रुग्णवाहिकेला अधिक मागणी शहरी भागातून आहे. एखाद्याला ताप आला तरीदेखील कोविड असावा, असा समज करून रुग्णवाहिका बोलावली जाते. परंतु ग्रामीण भागात ताप आला की घरातीलच लोक मोटारसायकलवर आणि रिक्षातून डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्यानंतर रुग्णवाहिकेला बोलावतात. १०८ रुग्णवाहिकेसाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडून कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका किमान अर्ध्या तासात हजर होते. मात्र, काही ठिकाणी रस्ते खराब आणि आदिवासी व डोंगरी स्वरूपाचा विभाग असल्यामुळे काही ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागतो तसेच दुसऱ्या कॉलला जाण्यासाठी विलंब लागतो.

रुग्णवाहिका संख्या २३
अलिबाग २, मुरुड १, रेवदंडा १, पेण १, पनवेल ३, उरण २, खालापूर हायवे १, कर्जत १, कशेळे १, माथेरान १, 
खोपोली १, पाली १, कोलाड १, तळा १, माणगाव १, 
महाड १, पोलादपूर १, म्हसळा १, रोहा १

Web Title: Also waiting for 108 ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.