अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत होत असलेल्या दुर्लक्षाकडे राज्य सरकारचे लक्ष गेले आहे. किल्ले रायगडावरील महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपण्याबराेबरच सुरक्षा चौकीसाठी पर्यायी व्यवस्था तातडीने उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी केंद्रीय पुरातत्त्व विभाग व रायगड जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
रायगड किल्ल्यावरील दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात विशेष वृत्त दिले होते. त्याची दखल घेत पर्यटन मंत्री लोढा यांनी सोमवारी तातडीने आपल्या दालनात बैठक बोलावून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, प्रांताधिकारी राहुल मुंडके, रायगड जिल्ह्याचे गृह उपअधीक्षक जगदीश काकडे, ट्रेकर आणि दुर्गप्रेमीचे राजेंद्र फडके, रायगड विकास प्राधिकरणचे सदस्य रघुजी राजे आंग्रे, केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या राजन दिवेकर व फाल्गुनी काटकर उपस्थित होते.
लोढा म्हणाले, अस्वच्छतेबाबत तसेच सुरक्षा चौकीबाबत दुर्गप्रेमी आणि इतिहास संशोधकांकडून तक्रारी येत आहेत. हा परिसर आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याच्या जतन व संवर्धनामध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही.
रायगड किल्ल्यावरील परिसराची स्वच्छता राखणे, सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत स्थानिक प्रशासनाने बैठक बाेलावून कार्यवाहीचा अहवाल विभागाकडे पाठवा.मंगल प्रभात लोढा,पर्यटन मंत्री