मोहोपाडा : पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने व बेकायदा पाणीपुरवठा केल्यामुळे वावंढळ या कोयना प्रकल्पग्रस्त वसाहतीबरोबर इतरही वाड्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील महिला आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जुन्या बोअरिंग दुरुस्तीस प्राधान्य दिले आहे.
वावंढळ या महसुली गावात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीचे स्वखर्चाने पुनर्वसन झाले आहे. या प्रकल्पग्रस्त वसाहतीत एकूण पाच योजना मंजूर झाल्या, या पाचही योजना नियोजनशून्य व हुकूमशाही पद्धतीने राबविल्या आहेत, असे ग्रामस्थांचे मत आहे. परिपूर्ण पाणी उपलब्ध नसताना या योजना ग्रामपंचायतींच्या माथी मारल्या आहेत. चौथ्या योजनेसाठी माजी आ. देवेंद्र साटम यांनी भिलवले धरणाचे पाणी उचलण्यासाठी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याकडून मंजुरी घेतली होती. मात्र, हेही पाणी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मृतसाठा होते, शिवाय गावापासून चार कि.मी. अंतरावर असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पंप व विद्युत पुरवठा यांची शक्ती कमी होते.
ही येणारी पाइपलाइन नदीतून असल्याने दर पावसाळ्यात पुरात वाहून जाते. विद्युत केबल व पंप यांची चोरी नियमित होत असल्याने ही योजना बंद झाली. गावतळ्यात अस्तित्वात असलेल्या योजनेसाठी शिवकालीन तलावाची दुरुस्ती करून त्याची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सूचित केले होते, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जांब्रूक व बौद्धवाडाबरोबर वावंढळवाडी, वावंढळगाव येथे तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
अनुसूचित जाती-जमाती आणि बौद्ध आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटना ठाणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेकर्जत तालुक्यातील टंचाईग्रस्त आदिवासी भागात दहा टँकर पाणी विहिरीमध्ये सोडण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील बांगरवाडीमध्ये गेली पाच वर्षे सातत्याने एलआयसी कामगार संघटना पिण्याचे पाणी देण्याचे काम करीत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक वेळी सामाजिक बांधिलकीची जोपसना करताना आपण पाहतो. अनेक वेळा कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात पाणीटंचाई काळात आदिवासी बांधवांची तहान भागविण्याचे काम एलआयसीने केले आहे. कर्जत तालुक्यातील काठेवाडी गावात एलआयसीने पाच हजार लीटरची पाण्याची टाकी बसवली आहे.
तर बांगरवाडी आणि ताडवाडी येथील विहिरीमध्ये टँकरचे पाणी सोडून भारतीय आयुर्विमा महामंडळाने आदिवासी बांधवांची जल पॉलिसी काढून त्यांना विमा संरक्षण दिले आहे. ग्रामस्थांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आणि एससी-एसटी संघटनेचे आभार मानले आणि पाऊस पडेपर्यंत या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली.
बांगरवाडीमध्ये पाण्याचा टँकर ओतताना एलआयसीच्या या सामाजिक उपक्रमात खोपोली शाखेचे मॅनेजर सुनील भोसले, प्रशासनिक अधिकारी आशिष झुंजारराव, विकास अधिकारी लता भगत, संघटनेचे सचिव राजेश गायकवाड यांच्यासह एलआयसीला मदत करणारे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सीताराम बांगर, मंजुळा गावंडा आदीसह ताडवाडी, बांगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.