नवाबकालीन शाळेसाठी माजी विद्यार्थी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:52 PM2018-10-30T22:52:35+5:302018-10-30T22:52:59+5:30
विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; नगरपंचायतीचे कार्यालय उभारणार
- अरुण जंगम
म्हसळा : म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा म्हसळा नं. १ च्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढून, त्या जागी आलिशान नगरपंचायत कार्यालय बांधण्याचा घाट नगरसेवकांनी बांधला आहे. विशेष म्हणजे, शाळेबद्दल जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी नुकतेच जाहीर केल्याने शाळेचे माजी विद्यार्थी संतापले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
म्हसळा शहरातील शाळा नं.१ ची नवाबकालीन इमारत जमीनदोस्त करून, या जागी नगरपंचायतीचे आलिशान कार्यालय बांधण्यासाठीचा प्रस्ताव दीड-दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला होता. या वेळी माजी विद्यार्थी आणि नगरसेवकांमध्ये झालेला वाद सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मध्यस्थीने सोडवला होता.
म्हसळा शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. त्यापैकी मराठी मुलांची शाळा हीसुद्धा एक आहे. म्हसळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी तत्कालीन नवाबाने अनेक शासकीय इमारती बांधल्या होत्या. यातील प्रत्येक इमारत बांधण्यामागे एक विशिष्ट उद्देश होता. आज शहरात रा.जि.प. उर्दू शाळा, अंजुमन हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा, शाईन उर्दू यांच्यासहित अनेक खासगी शाळा गेल्या अनेक वर्षांत सुरू झाल्या असल्या तरी म्हसळा नं. १ ची पटसंख्या १५५ इतकी आहे.
शिक्षकांच्या उत्तम अध्यापनामुळे ही शाळा शिक्षण विभागाच्या तपासणीत गुणवत्ता श्रेणी ‘अ’मध्ये सलग चार वर्षे राहिली आहे. तसेच रा.जि.प.ची प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यमाची ‘अ’ श्रेणीतील तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. यामुळेच म्हसळा शहरातील पालकांसोबत आजूबाजूच्या खेडेगावातील पालकांची आपल्या पाल्यासाठी या शाळेला विशेष पसंती आहे. वर्षागणिक या शाळेचा पट वाढतच आहे; परंतु या शाळेत शिकणाऱ्या व नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचा विचार न करता, म्हसळा नगरपंचायतच्या नगराध्याक्षासहित सर्वच नगरसेवकांनी ही वास्तू जमीनदोस्त करून नगरपंचायतची इमारत बांधण्याचा अट्टाहास चालवला आहे.
म्हसळा हिंदू स्मशानभूमीच्या भूमिपूजन कार्यक्र माप्रसंगी सुनील तटकरे यांनी, शाळेच्या जागी नगरपंचायत कार्यालय बांधण्यासाठी लागणारे जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र विद्यमान जि.प. अध्यक्षा अदिती तटकरे यांना सांगून, येत्या दोन दिवसांत देणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना वाºयावर सोडून कार्यालय बांधण्याची घाई प्रशासनासह नगरसेवकांना लागली आहे. त्यामुळे पालकांसह माजी विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे माजी विद्यार्थी सचिन कमलाकर करडे यांनी स्पष्ट केले.