मधुकर ठाकूर, उरण: उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडलेल्या जासई निवडणूक निकालानंतर विजयोत्सव साजरा करीत असताना अनवधानाने विजयाच्या भरात माझ्याकडून महिलांसंबंधी एक चुकीचा अपशब्द वापरला गेला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करून जाहीर माफी मागत असल्याचे निवेदन नवनिर्वाचित इंडिया महाविकास सरपंच संतोष घरत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवडून आल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना नवनिर्वाचित इंडिया महाविकास जासई सरपंच संतोष घरत यांनी भाषणातून महिलांबाबत अपशब्द वापरला.याविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारी नंतर संतोष घरत यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संतोष घरत यांनी याबाबत निवेदन देऊन स्पष्टीकरण दिले आहे.या निवेदनात जासई ग्रुप ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून मी गेली २ टर्म चांगलं केले म्हणूनच आता तिसऱ्या वेळी सुद्धा जासईच्या मतदारांनी मला निवडून दिले. यात महिलांचा वाटा मोठा होता. महिलांविषयी मला नेहमी आदरच आहे व यापुढेही असेल असे नवनिर्वाचित सरपंच संतोष घरत यांनी म्हटले आहे.
सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी जासई ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यामध्ये थेट सरपंच म्हणून माझा विजय झाला. हा विजयोत्सव साजरा करीत असताना भावनेच्या भरात अनवधानाने माझ्याकडून महिलांविषयी एक अपशब्द वापरला गेल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. त्याबद्दल मी जासई सरपंच संतोष घरत दिलगिरी व्यक्त करीत आहे. महिलांविषयी मला नेहमीच आदर आहे व यापुढेही असणार आहे. तरी महिलांविषयी कोणताही संकोच न बाळगता यापुढेही आदर व सहकार्याची भूमिका राहील असेही सरपंच घरत यांनी शेवटी निवेदनात म्हटले आहे.