माथेरानमधील अमन लॉज चढाव कमी होणार;एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:17 AM2020-11-10T00:17:01+5:302020-11-10T00:17:23+5:30

निधीमधून अमन लॉजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक असा साडेचार किलोमीटरचा रस्ता धूळ विरहित केला जाणार आहे.

Aman Lodge climb in Matheran will be reduced | माथेरानमधील अमन लॉज चढाव कमी होणार;एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात

माथेरानमधील अमन लॉज चढाव कमी होणार;एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामास सुरुवात

Next

कर्जत : माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या लाल मातीमधील तीव्र चढावाच्या रस्त्यावरील चढाव आणखी कमी होणार आहे. घोडे आणि हातरीक्षा यांच्यासाठी हा तीव्र चढाव तेथून प्रवास करताना शरीरातील सर्व ताकद एकवटून घेत असतो. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेकडून एमएमआरडीएला रस्त्यावरील चढाव कमी करण्यास सांगितले असून, त्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सरकारी यंत्रणेच्या ताब्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. या माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सामान हे हातगाडीमधून तर वयस्कर पर्यटक यांच्यासाठी चार माणसे ओढत असलेली हातरिक्षा टॅक्सी स्टँडपासून सेवा देत असते. त्याच वेळी पर्यटकांच्या दिमतीला असलेले घोडे हे टॅक्सी स्टँडपासून माथेरान गावात आणि माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांना सुविधा पुरवत असतात.

टॅक्सी स्टँडपासून पुढे अमन लॉज स्टेशननंतर सुरू होणारा महात्मा गांधी रस्ता हा हातरीक्षा, हातगाडी आणि घोडे यांची दमछाक करणारा आहे. या रस्त्यावर काळोखी परिसरात असलेला तीव्र चढावाचा रस्ता पर्यटकांची ने-आण करताना, सामानाची ने-आण करताना ही वाहने घेऊन जाणारे यांची दमछाक करीत असतो. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण आणि पर्यावरण संतुलित विकास करण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्या निधीमधून अमन लॉजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक असा साडेचार किलोमीटरचा रस्ता धूळ विरहित केला जाणार आहे. त्यात काळोखी येथील तीव्र चढावाचा भाग कमी उताराचा करण्यासाठी दगडी गॅबीयन बांधून रस्त्याची उंची वाढविण्यात आली होती. त्यानंतरही चढाव कमी करण्याची मागणी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून एमएमआरडीएला करण्यात आली होती. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडून आलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन, एमएमआरडीएचे आयुक्त आर.राजीव हे ऑक्टोबर महिन्यात माथेरानला आले होते. यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे आदी उपस्थित होते.

Web Title: Aman Lodge climb in Matheran will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड