राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : इमारतीला, घराला बांधकाम झाल्यानंतर ते शोभनिय दिसावे म्हणून रंगरंगोटी करतो. काहीजण घराला रंगकाम करताना हटके कलाकृती साकारतात. मात्र शासकीय इमारत असेल तर शक्यतो पांढरा कलर मारला जातो. मात्र काही शासकीय असलेल्या इमारतीला वेगळे पण देण्याच्या दृष्टीने कलाकृती सादर करून सर्वांचे लक्ष वेधले जाते. अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एसटीच्या प्रवासी प्रतीक्षालय थांब्याला ग्रामपंचायतीचे सदस्य जयेंद्र भगत यांच्या संकल्पनेतून एस टी बस आकार देण्यात आला आहे. त्यामुळे बस थांब्याचे रुपडे अधिक उठून दिसत आहे.
इमारतीला वेगवेगळे रुपडे देण्याची कला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातून कलाकाराची कला आणि इमारतीची शोभा वाढली जाते. अलिबाग वडखळ रस्त्यावर वाडगाव हे गाव असून याठिकाणी प्रवाशांसाठी एसटीचा प्रवासी थांबा आहे. मात्र प्रवासी यांना बसची वाट पाहण्यासाठी बसण्यासाठी प्रतिक्षालय थांबा नव्हता. त्यामुळे वाड गाव ग्रामपंचायतीने रस्त्याच्या बाजूला एस टी बस थांबा इमारत उभी केली. त्यामुळे बसला वेळ असताना प्रवासी या थांब्याचा वापर करतात. बसला रंगरंगोटी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदस्य जयेंद्र भगत यांनी थांबा प्रतिक्षालय इमारत आकर्षक बनविण्यासाठी कल्पना मांडली.
भगत यांच्या संकल्पनेतून प्रतिक्षालय थांब्याला एस टी बसचे रुपडे देण्यात आले आहे. अलिबाग मधील रंगरंगोटी करणारा चित्रकार कलाकार दीपक मयेकर याने ही एस टी बसची कलाकृती साकारली आहे. या बसच्या कलाकृतीला नंबर ही देण्यात आला असून फलक ही लावले आहे. त्यामुळे बस थांबा हा आकर्षक झाला असून येथे बसणाऱ्या प्रवाशांना आपण बस मध्येच बसल्याची अनुभती मिळाली आहे.