आंबेत पूल वाहतुकीस खुला; नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:12 AM2020-05-09T02:12:21+5:302020-05-09T02:12:24+5:30
वर्दळीत अडचणी : सुनील तटकरे यांच्याकडे मागणी
म्हसळा : सद्य:स्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विषाणू संसर्ग रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदी जोडमार्गावरील आंबेत पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदारीस तीन दिवसांपासून प्रशासनाच्या आदेशानुसार टाळेबंद करण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडल्याने आणि अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत असल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
आंबेत पूल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांतील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग येथे जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यांतील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेदी-विक्री सुरू असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते. आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाउन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा झाला. अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.
आंबेत पूलमार्ग पूर्ववत चालू करण्यासाठी लोकांनी रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. खा. तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवस बंद केलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.