आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:44 PM2020-05-30T23:44:24+5:302020-05-30T23:44:33+5:30

संडे अँकर । कामगार, निधीचा अभाव : पावसाळ्यात धोका कायम

In Ambet, repair of Dadali bridge stalled | आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

Next



सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. यामुळे पावसाळ्यात या तिन्ही पुलांचा धोका कायम राहिला आहे.
तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर पुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये पुलांची पाया दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. तर आंबेत आणि टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी पूल उचलले जाणार आहेत. मात्र कामगार, निधीचा अभावामुळे काम रखडले आहे.
महाड जवळील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानीही झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांचे पाण्याखालील भागाचे निरीक्षण आणि तपासणी केल्यानंतर पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणाऱ्या एजन्सीकडून सुचवण्यात आले.
आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत. शिवाय हे तिन्ही पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे आहेत. यामुळे पुलांना विशेष महत्त्व आहे. पुलांवरून सातत्याने अवजड वाहनांची आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.
आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून यादरम्यान या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक महाड मार्गे वळवण्यात आली आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल बेअरिंग पद्धतीचे आहेत. पुलांना जवळपास ४० वर्षे झाली आहेत. यामुळे पुलाखालील भागात दुरुस्ती केली जात आहे. पाण्याखाली असलेली पायाचे काँक्रिट निखळले आहे. ते काढून पुन्हा आधुनिक पद्धतीचे काँक्रिट लावले जाणार आहे. आंबेत पुलाच्या बेअरिंग नादुरुस्त झाल्या आहेत. या बेअरिंग दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. आंबेत आणि दादली पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती तर टोळ पुलाच्या पायाला उभ्या भेगादेखील आधुनिक पद्धतीने भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाहेरून काँक्रिटचे आवरण केले जाणार आहे. या पुलाच्यादेखील बेअरिंग बदलल्या जाणार आहेत. असेच काम दादली पुलाचेदेखील केले जाणार आहे. दादली पुलाचा पाया आणि खालील खडक यामध्ये तयार झालेली पोकळी काँक्रिटच्या साहाय्याने भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कामगार व निधीअभावी ही कामे ठप्प झाली आहेत.

टोळ, दादली, आंबेत तिन्ही पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका दुरुस्तीकामांनाही बसला आहे. निधी आणि कामगार नसल्याने हे काम सध्या थांबले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असल्याने काम पूर्ण होणे शक्य नाही.
- शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: In Ambet, repair of Dadali bridge stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.