आंबोली-आगरदांडा राज्यमार्गाची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:43 AM2019-12-22T01:43:28+5:302019-12-22T01:43:40+5:30
तीन वर्षांपासून काम रखडले । साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघातांचा धोका
आगरदांडा : रोहा-भालगाव-मुरूड राज्यमार्गावरील आंबोली ते आगरदांडा दरम्यानच्या रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. तीन वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण झालेले नाही. या मार्गावरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, महाड, माणगावकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. दिघी-आगरदांडा बंदर प्रकल्पाकडे जाणारा हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो.
राज्यमार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. मात्र साडेतीन मीटरचा मार्ग अजूनही अरुंद असून उंचीमुळे साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. आंबोली ते खोकरी मार्गावर बांधकाम विभागाकडून तीन वर्षात केवळ पॅचवर्क करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे भरले नसल्याने प्रवासी व चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रुग्ण तसेच वयोवृद्ध, गर्भवतींना तर प्रवास नकोसा होतो. अनेक तक्रारी करूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जंजिरा किल्ला, कुडे-मांदाड लेणी जाण्यासाठी आगरदांडा जेट्टी मार्गाचा वापर पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. हा मार्ग तीन वर्षांपूर्वीच कार्पेट-डांबरी होणे गरजेचे होते; मात्र याबाबत केवळ घोषणाच झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.