मुरुड : अंबोली धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. तथापि धरण क्षेत्रातील अंबोली, शिघ्रे आणि वावडुंगी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या १२ गावांतील शेतकरी धरणाचे काम रखडल्यामुळे दुपिकी जमीन कसू शकत नाहीत. अंबोली धरण लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या व डाव्या कालव्याचे काम जून २०१५ पासून बंद असल्यामुळे धरण रेषेखालील ६१६ हेक्टर क्षेत्रावर भाताचे खरीप पिकावर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. उजवा तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाजदे, शिघ्रे, नवी वाडी या गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर तर डावा तीर कालव्याकरिता अंबोली, गोयगान, खारअंबोली ग्रामस्थांची जवळपास तेवढीच जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे.धरणग्रस्तांना अंशत: मोबदल्याचे वाटप झाले तर काही शेतकऱ्यांना तो मिळायचा बाकी आहे. उपलब्ध निधीप्रमाणे उजवा व डाव्या तीराचे काम अनुक्रमे १ ते १.५० किमी पेक्षा पुढे न सरकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसते. दुपिकी पिकांसाठी कालव्याचे काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण सुशिक्षित युवकांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीशिवाय दुसरा मार्ग नाही. धरणाचे काम तातडीने सुरू व्हावे, असे मत अंबोलीचे सरपंच यांनी व्यक्त केले.
अंबोली कालव्याचे काम रखडले
By admin | Published: March 26, 2016 2:39 AM