आंबापृथ्वीवरचे अमृततुल्य फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:09 AM2019-06-07T00:09:59+5:302019-06-07T00:10:09+5:30

देशात फळांमध्ये सर्वात जास्त चर्चा आंब्याची होते. आपल्याकडे आंब्याचे विविध प्रकार उपलब्ध असून त्या त्या आंब्यांचे समर्थक आपल्याला आवडणाऱ्या आंब्यांचा प्रचार करणे सुरू करतात. त्यासाठी इतरांपेक्षा आपला आंबा कसा चांगला आहे, हे सांगताना इतर आंब्यांना नावेही ठेवली जातात.

Ambrosia fruit on the Amambit | आंबापृथ्वीवरचे अमृततुल्य फळ

आंबापृथ्वीवरचे अमृततुल्य फळ

Next

संतोष देसाई

देशात फळांमध्ये सर्वात जास्त चर्चा आंब्याची होते. आपल्याकडे आंब्याचे विविध प्रकार उपलब्ध असून त्या त्या आंब्यांचे समर्थक आपल्याला आवडणाऱ्या आंब्यांचा प्रचार करणे सुरू करतात. त्यासाठी इतरांपेक्षा आपला आंबा कसा चांगला आहे, हे सांगताना इतर आंब्यांना नावेही ठेवली जातात. हा लेख आंब्यांविषयी असला तरी कोणत्याही आंब्याविषयी मतप्रदर्शन करणार नाही. आंबा हे फळ अनेकांच्या आवडीचे असल्याने त्या फळाने आपल्या जीवनात काय भूमिका बजावली आहे हेच या लेखातून प्रामुख्याने मांडण्यात आले आहे.

जेव्हा वस्तूंचे दुर्भिक्ष असते तेव्हा त्याचे रेशनिंग करणे भाग पडते; पण काही वस्तू मुबलकपणे मिळत असतात. केळी किंवा बटाटे यांचे दुर्भिक्ष असल्याचे कधी पाहण्यात आले नाही. या गोष्टी नेहमीच मुबलक प्रमाणात मिळत आल्या आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळा आला की आंबेदेखील खूप प्रमाणात मिळू लागतात. अशा वेळी घराघरांत आंब्यांच्या टोपल्या किंवा पेट्या दिसू लागतात. कच्चे आंबे काहींच्या घरातच पिकतात, तेव्हा त्यांचा पक्व दरवळ घरात पसरून आपला जठराग्नी प्रज्वलित करू लागतो. आंबा पिकला की घरातील लोक त्यावर तुटून पडतात. मग त्या वेळी आंब्याच्या जातीकडे फारसे बघितले जात नाही. आंब्याच्या रसाने माखलेले तोंड हे घराघरांत सुखासमाधानाची पखरण करीत असते.

पिकलेल्या गावरान आंब्यातील रस तोंडाने चोखून शोषून घेण्यात वेगळाच आनंद मिळतो. त्यात जगण्यातला खरा आनंद मिळत असतो. आंबा खाण्याची प्रक्रिया हीसुद्धा दीर्घ असते आणि सुख देणारी असते. त्यासाठी अगोदर आंबा मऊ करण्यासाठी माचवावा लागतो. आंबा माचवल्याने आंब्यातील गर कोयीपासून वेगळा होतो. त्यानंतर तो रस चोखून पोटात रिचवला जातो. सालापासून रस पूर्ण शोषून घेतल्यावरच ती साल फेकून देण्यात येते. आंब्याचा रस ग्रहण करीत असताना मोबाइल फोनच्या वाजण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. कारण त्या वेळी सारे जग आपल्या मुखात एकवटलेले असते! आपण रस चोखतो आणि गिळतो. तो आपल्या घशातून अन्ननलिकेत उतरत असताना आपण अतीव आनंदाचा अनुभव घेत असतो. अगोदर आंब्याच्या सालीतील रस ग्रहण केल्यानंतर आपण कोयीतील रसाचा आस्वाद घेण्यात तल्लीन होतो. आंबा खाण्याचा याहून सभ्य मार्ग अजूनतरी सापडलेला नाही आणि अशा तºहेने आंबा खाण्यातच समाधान साठवलेले असते.

मी गुजराती आहे आणि प्रत्येक गुजराती माणसाच्या भोजनाचा आमरस हा अविभाज्य घटक असतो. आंब्याचा रस काढून तो एखाद्या पातेल्यात साठवून त्या आमरसाच्या आधारे जेवण करणे हे गुजराती भोजन संस्कृतीचे अविभाज्य अंग असते. अन्य लोकांची संस्कृती आमरसाची गणना जेवणातील डेझर्ट या प्रकारात करीत असते; पण आमरसाने जेवणाचा शेवट करणे गुजराती मनाला मान्य नसते. त्याच्या जेवणाच्या केंद्रस्थानी आमरस असतो. त्यामुळे जेव्हा आमरस तयार होतो तेव्हा जेवणातील अन्य पदार्थांना दुय्यम स्थान प्राप्त होते. आंब्याचा सिझन आला की आमरस हा ठेवलेलाच. मग त्याच्यासोबत कधी पुºया असतात किंवा पोळीचे विविध प्रकार असतात.
पण काही आंब्यांच्या फोडीच करून त्या खायच्या असतात, त्या वेळी आंबा खाण्यावर साहजिकच बंधने येतात, अशा वेळी आंब्याच्या फोडीचे वाटप करताना राजकीय चतुराई दाखविली जाते. आंब्याच्या फोडी खाल्ल्यानंतर उरलेली कोय कुणी खायची हाही घरोघरी वादाचा विषय ठरतो. काही जण कोयीचा त्याग करून त्यागमूर्ती बनतात तर काही जण कोयी चोखून खाताना आपल्या अधाशीपणाचे दर्शन घडवितात. याप्रकारे प्रत्येकाला आंब्याचा आस्वाद घेता येतो आणि प्रत्येक जणच विजयी होत असतो.

आंब्याचा आस्वाद हा पिकलेल्या आंब्यापुरताच मर्यादित नसतो. कच्च्या कैरीच्या फोडी कापून त्या तिखट, मीठ, मसाल्यासह खाण्यातही वेगळाच आनंद मिळत असतो. कधी कधी कैरीच्या फोडींना मिठाच्या पाण्यात बुडवून, त्यावर हळद शिंपडून त्या फोडी उन्हात वाळवण म्हणून ठेवण्यात येतात, त्या वेळी घरातल्या मुलांना त्याकडे फिरकू दिले जायचे नाही; पण तरीही आम्ही मुले त्या फोडी चोरून त्यांचा आस्वाद घेत असायचो. कैरीपासून तयार होणारे लोणचे हेही एक आवडणारे व्यंजन असायचे. या कैरीच्या लोणच्यांचे अगणित प्रकार असतात. त्या फोडींना मसाल्यात बुडवल्याने त्यांना एक वेगळी चव येते. आंब्याच्या लोणच्याने तोंडाला पाणी सुटले नाही अशी व्यक्ती आढळणे विरळच. प्रत्येक प्रदेशानुसार लोणच्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक लोणचे आपल्या परीने श्रेष्ठच असते.

लोणच्याशिवाय कैरीपासून तयार केले जाणारे पन्हे हेही माणसाचा उन्हाळा सहनीय करीत असते. आंब्याच्या पापडाची खुमारी वेगळीच असते. गुजराती छुंदा हा प्रकारही मेजवानीसारखाच असतो. त्यात आंबट, गोड, तिखट अशा सर्व चवींचा अनुभव घेता येतो; पण पिकलेल्या आंब्यातील गोडीची तुलना अन्य कोणत्याच गोड पदार्थाशी करता येत नाही. तसेच आंबा हा गुणवत्तेत अन्य फळांच्या तुलनेत वरच्या दर्जाचा असतो. त्यापासून मिळणाºया समाधानाची तुलना अन्य कुठल्याही फळापासून मिळणाºया समाधानाशी करता येणार नाही. पिकलेल्या आंब्याच्या कापलेल्या फोडी खाताना स्वर्गीय सुखाचा अनुभव देत असतात.

२००२ साली सिंग, लाल आणि नायर यांनी आंब्याचे संशोधन केले असता विविध प्रकारच्या आंब्यात २८५ प्रकारचे सुगंध असल्याचे आढळून आले. आंब्यात असलेल्या द्रव्यात सात प्रकारची असिड्स, ५५ प्रकारचे अल्कोहोल, २६ प्रकारचे किटोन्स, १४ प्रकारचे लॅक्टोन्स, ६९ प्रकारचे हायड्रोकार्बन्स, ७४ प्रकारचे ईस्टर्स आणि नऊ अन्य कंपाउंड्स असल्याचेही आढळून आले आहे.

एकूणच आंबा हे फळ भूलोकांचे अमृतच म्हणावे लागेल. आपल्या स्वर्गाच्या कल्पनेत फळांचा समावेश असतोच. निसर्ग हा मानवावर उदार होऊन फळांची बरसात करीत असतो. आदिमानवाने पहिल्यांदा आंबा खाल्ला असेल तेव्हा त्याच्या भावना काय असतील? त्या काळी जेव्हा कृत्रिम साखर उपलब्ध नव्हती आणि आपल्या संवेदनांना गोड चवीची जाणीव नव्हती, तेव्हा पहिल्या आंब्याची चव त्याला कशी वाटली असेल?

Web Title: Ambrosia fruit on the Amambit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.