माणगाव, पोलादपूरमध्ये रुग्णवाहिका बंद, डॉक्टर नसल्याने अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:46 AM2019-11-13T00:46:02+5:302019-11-13T00:46:07+5:30

संपूर्ण राज्यात १०८ नंबरच्या रुग्णवाहिका शासनाने ग्रामीण रुग्णालयात दिल्याने सर्वसामान्य रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी स्थलांतर करताना सोपे झाले.

Ambulance closed in Mangaon, Poladpur, difficulty due to lack of doctors | माणगाव, पोलादपूरमध्ये रुग्णवाहिका बंद, डॉक्टर नसल्याने अडचण

माणगाव, पोलादपूरमध्ये रुग्णवाहिका बंद, डॉक्टर नसल्याने अडचण

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : संपूर्ण राज्यात १०८ नंबरच्या रुग्णवाहिका शासनाने ग्रामीण रुग्णालयात दिल्याने सर्वसामान्य रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी स्थलांतर करताना सोपे झाले. आधुनिक पद्धतीच्या वातानुकूलित रुग्णवाहिकांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी डॉक्टरांअभावी या रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. माणगाव आणि पोलादपूरमधील रुग्णालयात १०८ नंबरच्या रुग्णवाहिकाही बंद असल्याने रुग्णांचे हाल झाले आहेत.
१०८ या आॅन कॉल तत्त्वावरील रुग्णवाहिका शासनाने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून सुरू केल्या. या रुग्णवाहिकांमुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा झाला. अपघातप्रसंगी किंवा महिलांकरिता या रुग्णवाहिका वरदान ठरल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका या वातानुकूलित असून, यामध्ये आॅक्सिजन आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. शिवाय एक डॉक्टरही असल्याने रुग्ण स्थलांतर करताना रुग्णांची स्थिती वेळोवेळी जाणून घेता येते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिका डॉक्टरांअभावी बंद आहेत. यामध्ये माणगाव आणि पोलादपूरमधील रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.
माणगाव आणि पोलादपूरमधील ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचार घेणे परवडते, यामुळे माणगाव आणि पोलादपूरमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. मात्र, अन्य ठिकाणी उपचारासाठी रुग्णांना स्थलांतर करायचे असेल तर १०८ नंबरवरून रुग्णवाहिका मागवणे सहज शक्य होते. माणगाव आणि पोलादपूर येथील दोन्ही रुग्णवाहिका डॉक्टरांअभावी गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हीच अवस्था महाड ट्रामामध्येही झाली असून, महाड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका गेली अनेक दिवस टायरअभावी उभी आहे. महाड ट्रामा युनिटला सर्वाधिक महत्त्वाची सुविधा असलेली रुग्णवाहिकाच उपलब्ध नाही. या ठिकाणी महाड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका वापरली जात आहे. मात्र, ही रुग्णवाहिकाही सध्या बंद आहे.
>खासगी रुग्णवाहिकेचा भुर्दंड रुग्णांना
महाड तालुक्यातील सुमारे ३०० च्या आसपास रुग्ण प्रतिदिन ट्रामा केअरमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. यातील काहींना तातडीच्या उपचाराकरिता किंवा महामार्ग अपघात प्रसंगी अपघातग्रस्तांना मुंबई किंवा अन्य रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यासाठी १०८ चा वापर केला जातो. शिवाय, पोलादपूर किंवा माणगावमध्येही महाडमधील १०८ रुग्णवाहिकाच जात असल्याने या ठिकाणी रुग्णवाहिकेची नितांत गरज भासत असते. तिन्ही रुग्णालयाला सध्या एकच रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने अपघातामधील रुग्णांना १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णवाहिकेने पाठवले जाते, यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा भुर्दंड रुग्णांना किंवा अपघातग्रस्तांना सहन करावा लागत आहे.
>रुग्णवाहिकेचा टायर खराब झाला असून, नवीन टायर बदलण्यासाठी स्थानिक पातळीवर तरतूद ठेवण्यात आली नसून याबाबत जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे टायर बदलीसाठी पत्रव्यवहार के ला आहे. या बाबत अद्याप उत्तर न मिळाल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे. शिवाय, शासनाची १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी ही रुग्णवाहिका अपघातावेळी किंवा रुग्णांना आणण्यासाठी किंवा मुंबईसह अन्य ठिकाणी गेल्यानंतर महाड ट्रामाकडे रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही.
- डॉ. दीपक अडकमोल, प्रभारी अधीक्षक

Web Title: Ambulance closed in Mangaon, Poladpur, difficulty due to lack of doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.