बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका कायम नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत लाभलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वर्षाला ५० हजार रुग्ण रुग्णसेवेचा लाभ घेत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ३५,४२५ एवढी लोकसंख्या येत असून ३९ गावे, ५२ वाड्या, मांघरुण, वाळणखुर्द, निगडे, शेलटोली, दहिवड, वाळण बुदु्रक अशी सहा आरोग्य उपकेंदे्र येतात. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० ते १५० रुग्ण तपासणीकरिता येत असतात. या ठिकाणी एका वर्षामध्ये ५० हजार रुग्णांना रुग्णसेवा दिली जाते. त्याचप्रमाणे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी महिन्याला १५ ते २० महिलांची प्रसूती होत असते. या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ही पदे गेल्या ७ वर्षांपासून रिक्त आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यांमध्ये होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्याकरिता कायमस्वरूपी शिपाई नेमणे गरजेचे आहे. शासनामार्फत याठिकाणी औषधपुरवठा सुरळीत केला जात असला तरी रुग्णसेवेकरिता अत्यावश्यक असणारी रुग्णवाहिका कायम नादुरुस्त असल्याने याठिकाणी रुग्णांची गैरसोय होत असते. नूतन रुग्णवाहिका मिळावी याकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केल्याचे वैद्यकीय अधिकारी इ. सी. बिरादार यांनी सांगितले. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वर्षाला ५०० रुग्ण विंचुदंश, १०० रुग्ण सर्पदंश, ४०० ते ५०० रुग्णांना श्वानदंश अशी रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांकरिता आवश्यक असणारे साहित्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट या योजनेंतर्गत सेवाभावी संस्थांंमार्फत उपलब्ध करण्यात आले आहेत.
आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त
By admin | Published: July 08, 2015 10:45 PM