सुनील बुरूमकर -
कार्लेखिंड : देशात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी विविध प्रयोग करत आहेत. रायगड जिल्ह्यातून गुळवेल, तूळस, गवती चहा, अश्वगंधा आणि आलं अशा रोपांची लागवड करण्यासाठी नर्सरीमधून मागणी वाढत आहे.काेराेनाला चार हात लांब ठेवण्यासाठी नागरिकांचा ओढा हा विविध औषधी वनस्पतींकडे वळला आहे. समाजमाध्यमांवर अशा विविध गाेष्टी सातत्याने वाचनात येत आहेत. त्याची आवश्यक ती अधिक माहिती संकलित करून प्रत्येकाचे गुणधर्म काय आहेत, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणात करायचा याचा अभ्यास करत आहेत. या वनाैषधी अत्यंत गुणकारी आणि उपयाेगी असल्याने नागरिक औषधी वनस्पतींची राेपेच घरात आणून लावत आहेत. पाहिजे तेव्हा त्यांचा वापर करण्यात येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत माणूस पुन्हा एकदा वनौषधीकडे वळत आहे. आपल्या प्राचीन औषधींचे महत्त्व कळत आहे. त्यानुसार कोरोना संक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष वेधत आहे. त्यामुळे पुन्हा झाडपाल्यांच्या औषधींना महत्त्व प्राप्त होत आहे. आज गुळवेल, अश्वगंधा आणि आलं यासारख्या रोपांची मागणी वाढली आहे.सुनील मांजरेकर, नर्सरी मालक
कोरोनामुळे प्रत्येक जण भयभीत झाला आहे. त्यामुळे इम्युनिटी वाढविण्यासाठी नागरिक औषधी वनस्पतींची रोपे खरेदी करत आहेत व आपल्या जागेमध्ये लागवड करत आहेत. यामध्ये तूळस, स्नेक प्लँट, स्टिव्हिया यासारख्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.सुनील गोंधळी, नर्सरी मालक
घरात, घराबाहेर लावण्यायोग्य झाडेगुळवेल : गुळवेल ही वनौषधी आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. रोग प्रतिकारशक्ती, पचनाचे विकार, सांधेदुखी अशा अनेक रोगांवर उपयुक्त असल्याने या गुळवेल वनस्पती रोपांची मागणी वाढली आहे.तुळस : तुळशी वृंदावन हे प्रत्येक घरासमोर असते. परंतु, सध्याच्या काळात या वृक्षास महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीच्या पानांतून रस काढला जातो. तुळशीच्या वनस्पतीने घरात येणारी हवा शुद्ध असते. त्यामुळे ऑक्सिजन उत्तम मिळतो. शक्ती, स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. शारीरिक तक्रारी कमी करण्यास तुळस अत्यंत उपयुक्त ठरते.अश्वगंधा : अश्वगंधा झुडूप वर्गातील वनस्पती आहे. ही वनस्पती प्रत्येक भागात येते. या वनस्पतीच्या मुळापासून औषध बनविले जाते. रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहते.स्नेक प्लॅंट : सध्याच्या परिस्थितीमध्ये स्नेक प्लँट या रोपट्यांनासुद्धा मागणी आहे. कारण हे प्लँट घरातील कोणत्याही ठिकाणी ठेवता येते. हवा शुद्ध करून ऑक्सिजनची पातळी वाढविते. तसेच हे प्लँट घरात ठेवल्याने दमा, सर्दी आणि ॲलर्जी अशा आजारांवर औषधी आहे.आलं : आलं हे कंदमूळ आहे. अत्यंत बहुगुणी आहे. सध्याच्या परिस्थितीत कफ आणि खोकला यावर आलं गुणकारी ठरत आहे.