माथेरान : काही महिन्यांपूर्वी माथेरानमधील दि बाईक हॉस्पिटीलिटी या कंपनीने प्रवासी कराचा अत्यंत आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठेका ई-टेंडरिंगद्वारे मिळविला होता; परंतु यामध्ये ही कंपनी तग धरू शकली नसून, प्रवासी कराच्या या ठेक्यातील हप्त्याची रक्कमसुद्धा नियोजित वेळेत भरू न शकल्यामुळे नाईलाजाने नगरपरिषदेने नियमानुसार या कंपनीला नोटीस बजावून हा ठेका आपल्या ताब्यात घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी हा ठेका दि बाईक हॉस्पिटीलिटी या कंपनीने ई-टेंडरिंगद्वारे प्राप्त केला होता. सर्वाधिक उत्पन्न याच ठेक्याच्या माध्यमातून नगरपरिषदेला मिळत असते. त्यामुळे हा ठेका घेणाऱ्याने सुरुवातीला फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोषात केला होता; परंतु याबाबत नगरपरिषदेला नियोजित वेळेत हप्त्याची रक्कम भरू शकले नाहीत. अल्पावधीतच नांगी टाकल्याने या कंपनीकडे आता ७२,६४,३१८ रुपये थकबाकी आहे. जवळपास या कंपनीची ५१ लाख रुपये इतकी अनामत रक्कम नगरपरिषदेकडे जमा असली तरीसुद्धा उर्वरित रक्कम त्याच्या नावे शिल्लक आहे.
हप्त्याची रक्कम वेळेत भरत नसल्याने या कंपनीला ३१ मे रोजी नोटीस बजावली होती; परंतु कंपनी सदर हप्त्याची रक्कम भरू शकले नाहीत, त्यामुळे नियोजित वेळेपूर्वी हा ठेका या कंपनीकडून नगरपरिषदेने २ जून रोजी ताब्यात घेतला आहे. रेल्वे स्टेशन नाक्यावर असलेल्या कार्यालयातील विद्युत पंखे, लाकडी टेबल आणि अन्य साहित्य ताब्यात घेताना पंचनामा करण्यात आला आहे. लवकरच थकबाकी रक्कम न भरल्यास या कंपनीवर नगरपरिषद कलम १४९,१५० आणि १५२ नुसार कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांकडून समजते.