अमूर फाल्कन अलिबागमध्ये, ४४ हजार किमीचा अमूरलंँड ते द.आफ्रिका प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:04 AM2017-12-07T00:04:06+5:302017-12-07T00:04:06+5:30
चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत
जयंत धुळप
अलिबाग : चीन आणि रशिया सीमेवरील अमूरलँड क्षेत्रातील मांसाहारी गटात मोडणारा ‘अमूर फाल्कन’ हे प्रवासी पक्षी अमूरलँड ते दक्षिण आफ्रिका हा तब्बल ४४ हजार किमी अंतराचा अनोखा प्रवास अलिबागमार्गे करीत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ.वैभव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
अमूर फाल्कन या पक्ष्याची प्रवासी क्षमता आश्चर्यकारक अशीच आहे. अमूर लँडमधील त्याच्या वास्तव्यामुळेच त्यास अमूर फाल्कन असे म्हटले जाते. हे फाल्कन चीनमधून उत्तरपूर्व नागालँड मार्गे भारतीय द्वीपकल्पांमध्ये प्रवेश करतात. भारताच्या पश्चिमेकडील खोºयातून भारत ओलांडून दक्षिण आफ्रिकेकडे जाताना नोव्हेंबर महिन्यात ते अलिबागमध्ये काही दिवस वास्तव्यास असतात. आफ्रिकेतून ते अफगाणिस्तानातून हिमालय पार करून मूळ अमूरलँडमध्ये पोहोचत असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.
गेल्या १५ वर्षांत अमूर फाल्कनची अलिबाग परिसरातील वास्तव्य संख्या सतत वाढत असून, यंदा सर्वाधिक म्हणजे एक हजार अमूर फाल्कनची नोंद झाली असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.
अमूर फाल्कन हे मांसभक्षक पक्षी आहेत, त्यांना अलिबाग परिसरात त्यांचे खाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असावे, परिणामी त्यांची येथे येण्याची संख्या वृद्धिंगत झाली असावी असा निष्कर्ष डॉ.देशमुख यांनी काढला आहे.