जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
By राजेश भोस्तेकर | Published: December 26, 2023 07:13 PM2023-12-26T19:13:16+5:302023-12-26T19:13:43+5:30
या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकांना टॉवेल देण्याचा मानस प्रशासनातर्फे केला होता. त्यादृष्टीने मंगळावर २६ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवसापासून नवजात बालकांना टॉवेल देण्याचा नाविन्य पूर्ण उपक्रम सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे डॉ. भरत बास्टेवाड यांच्या शुभहस्ते कार्यक्रम जिल्हा रुग्णालयात संपन्न झाला. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी (घुगे), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, मेट्रन मॅडम भोपी, जिल्हा लेखा व्यव्यस्थापक श्री. संतोष पाटील, फायनान्स कम लॉजिस्टिक कंसल्टंट श्री. प्रथमेश मोकल, आरबीएसके डीपीएस श्री. सुनील चव्हाण, प्रसूती विभागातील इन्चार्ज सिस्टर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी हे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आदिवासी वाडी, वस्ती व गरीब घरातून अशा विविध ठिकाणावरून प्रसूतीसाठी गरोदर माता येत असतात. याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला ३०० ते ३५० प्रसूती या मोफत केल्या जातात. यामध्ये गुंतागुंतीच्या तसेच सीझर करण्यात आलेल्या प्रसूतींचाही समावेश होत आहे.
प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर माता या जिल्ह्यातील विविध भागातून येत असतात. घाई गडबडीमध्ये येत असल्यामुळे, येताना त्या कोणत्याही प्रकारचे कपडे, वस्त्र घेऊन येत नाहीत किंवा आणलेले वस्त्र हे जुने व अस्वच्छ असल्यामुळे, नवजात बालकाला आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होण्याची शक्यता असते. या काळात नवजात बालकाची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात बालकांना मोफत टॉवेल देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण
कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या शुभहस्ते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाचा होत असलेला पूर्ण कायापालट हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे मुळे होत असल्याचे सांगून जिल्हा शल्यचिकित्सक यांचे डॉ भरत बास्टेवाड यांनी विशेष कौतुक केले. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता माझे नेहमीच सहकार्य राहील, असे अभिवाचन दिले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता सामाजिक बांधिलकीतून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या सीएसआर फंडामधून आवश्यक ते सहकार्य मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने यांनी केले.