उरणमधील सुमारे ४०० कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 04:57 PM2023-12-25T16:57:55+5:302023-12-25T16:58:39+5:30

एसआयटीमार्फ‌‌‌त चौकशीची संघर्ष समितीची मागणी.

An outcry march of investors in the case of about 400 crore scam in Uran | उरणमधील सुमारे ४०० कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा

उरणमधील सुमारे ४०० कोटी घोटाळ्या प्रकरणी गुंतवणूकदारांचा आक्रोश मोर्चा

मधुकर ठाकूर,उरण : उरणमधील सध्या गाजत असलेल्या सुमारे ४०० कोटींच्या चिटफंड घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आयोजित आक्रोश मोर्चात

उरण संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.उरण परिसरातील चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गरीब-श्रीमंत अशा हजारोंच्या संख्येने शेकडो कोटी रुपये पिरकोन गावातील सतिश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील या व्यक्तींकडे गुंतविले आहेत. ऐपत नसतानाही शेकडो गरीबांनी जमीन -जुमला, दागदागिने विकून आणि काहींनी तर उसणवारी,व्याजाने कर्ज काढून ४५ दिवसात दुप्पटीने पैसे मिळतील या आकर्षक लोभाला बळी पडून पैशाची गुंतवणूक केली आहे.कुणी थेट तर कुणी एजंटांच्या मदतीने पैसे गुंतवले आहेत.यामध्ये उरण, पनवेलमधीलच नव्हे तर राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांचा समावेश आहे.फसवणुक झालेल्या गुंतवणुकीचा आकडा ४०० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

 मात्र या प्रकरणी पोलिसांनी फक्त १० कोटी रुपये रोख रक्कम आणि सुमारे ३५ ते ४० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.पोलिसांच्या आवाहनानंतरही फक्त २५० ते ३०० तक्रारदारांनीच तक्रारी दाखल केल्या आहेत.या उलट या चिटफंड प्रकरणी सुमारे १० हजार गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आहेत.त्यामुळे चिटफंड घोटाळ्याचा आकडा जवळपास ४०० कोटींच्या घरात आहे.या चिटफंड घोटाळा प्रकरणी मुख्य दोनच आरोपी अटकेत आहेत.

मात्र त्यांचे साथीदार एजंटांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ते उजळमाथ्याने फिरत आहेत.दोन्ही मुख्य अटक आरोपींची पोलिसांनी सखोलपणे व योग्य प्रकारे चौकशी केली नसल्याने गुंतवणूकदारांकडून जमा केलेली सुमारे ४०० कोटींची रक्कम कुठे ठेवली आहे,  कुणाकडे ठेवली आहे याची सखोल चौकशी झालीच नसल्याचे उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील यांचे म्हणणे आहे.आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी आक्रोश मोर्चातुन जाहीरपणे केली आहे.उरणमधील

चिटफंड घोटाळाप्रकरणी नुकताच नागपुरात हिवाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या आक्रोश मोर्चात विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, पुढारी सहभागी झाले होते. सभेला संयोजकांनी आक्रोश मोर्चाचे नाव दिले होते असा दावा उरण पोलिसांनी माहिती देताना केला आहे.

Web Title: An outcry march of investors in the case of about 400 crore scam in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.