वावोशी : खोपोली नगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर चालणे प्रवाशांना अवघड झाले आहे. खोपोली नगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी पालिका प्रशासन व मोठ्या पोलीस फौजेसह अनधिकृत दुकानांवरती बुलडोजर फिरवून कारवाई केली. यामुळे खोपोलीतील रस्ते मोकळे झाले आहेत. या कारवाईमुळे खोपोलीकरांनी समाधान व्यक्त केले. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांवर पोलीस आणि नगरपालिका प्रशासन संयुक्त करावाई सुरू ठेवणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.खोपोली व आजूबाजूचा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने खोपोलीत पर्यटकांची गर्दी वाढत आहे. खोपोली रेल्वेस्थानक ते खोपोली पोलीस स्टेशन या मुख्य रस्त्यावर अनधिकृत भाजीवाले व फळवाल्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याचे गांभीर्य ओळखून पालिका प्रशासनाने अनेक वेळा कारवाईची नोटीस बजावली, तरीही या नोटिशीला भाजी व फळविक्रेत्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने, खोपोलीतील सर्वात मोठी कारवाई मुख्याधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईनंतर पुन्हा हे दुकान घेऊन रस्त्यावर बसणार नाही ही जबाबदारी नगरपालिका प्रशासनाचीच आहे. पोलिसांची पालिका प्रशासनाने मदत मागितल्यास मदत देण्यास तयार असल्याचे खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.फळवाले हे अनधिकृत नसून, हे २०१३ रोजी पालिका प्रशासनाने अधिकृत असल्याचे पत्र या दुकानदारांना दिले आहे. यामुळे फळवाल्यांवरील कारवाई चुकीची आहे, असे सेनेचे खोपोली शहर माजी शहरप्रमुख राजन सुर्वे यांचे म्हणणे आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:14 AM