उरण : उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या एका खांबाखालील चौथऱ्यावर सोमवारी दहशतवाद्यांशी संबंधित आढळून आलेला मजकूर, सांकेतिक आकडे आणि या ठिकाणी काढण्यात आलेल्या आकृत्यांंचा गुंता सोडविण्यासाठी उरण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. सांकेतिक बाबींचा गुंता सोडविण्यासाठी विशेष विश्लेषकांची मदत घेण्याची तयारीही पोलिसांनी सुरू केली आहे.
उरण तालुक्यातील खोपटा पुलाखालील एका चौथऱ्यावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळल्याने परिसर आणि पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. काळ्या रंगाच्या मार्करने तीन भागांत लिहिलेले संदेश, तसेच देवनागरी व इंग्रजी भाषेत सांकेतिक आकडे, आकृत्यांंच्या विश्लेषणासाठी उरण पोलिसांकडून तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास अन्य तपास यंत्रणांची मदत घेण्यात येईल, अशी माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.दरम्यान, मंगळवारी दिवसभरात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास अधिकाºयांंशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शनही केले. हे सांकेतिक मजकूर प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. मात्र, शेजारीच आढळून आलेल्या बीअर, दारूच्या बाटल्यांमुळे कुणी तरी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याचा उलगडा तपासाअंतीच होईल असे वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.तपास यंत्रणा सतर्क आहेच. मात्र, नागरिकांनीही सजग असणे आवश्यक आहे. परिसरात कुणीही संशयित व्यक्ती, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. - जगदिश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण.