माणगाव : युतीचे उमेदवार अनंत गीतेंना जनतेच्या समोर जाण्यासाठी लोटांगण घालावे लागत आहे. मात्र, मी लोकांसमोर जाताना विकासकामे घेऊन जात आहे, त्यामुळे या निवडणुकीत माझाच विजय आहे. माणगावकरांनी ३० ते ३५ वर्षे सेवा करण्याची संधी मला दिली, असे प्रतिपादन रायगड लोकसभा आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी के ले. माणगाव बाजारपेठेमध्ये १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सभेचे आयोजन केले होते, त्या वेळी तटकरे बोलत होते. सर्वहरा जनआंदोलन रायगड, जमात ए इस्लाम तसेच सिद्धिविनायक चालक-मालक संघटना यांनी पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. माणगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेसाठी आलेले उद्धव ठाकरे यांना लोकांची वाट बघण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसार्इंच्या घरी लोकांची वाट बघत बसावे लागले; परंतु माणगावकरांनी कधी सुनील तटकरेंना बसवून ठेवले नाही. मोदी हे लोकांना अच्छे दिन बोलायचे; परंतु आएंगे हा शब्द मात्र लोकांकडूनच बोलवून घ्यायचे. अशा प्रकारे लोकांची फसवणूक मोदींकडून मागील पाच वर्षांत झाली आहे. काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली. ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसने केला. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली संगणक क्षेत्रात प्रगती झाली. २००४ मध्ये देशात, राज्यामध्ये धर्मनिरपेक्ष सत्ता आली; परंतु आताच्या सरकारने सर्वसामान्य लोकांना फसविले असून, जन-धन योजनेअंतर्गत बँक खात्यामध्ये १५ लाख जमा होणार, दोन कोटी नोकऱ्या मिळणार ही सर्व फसवणूक झाली.उद्धव ठाकरे यांना स्वप्न पडले की, मंदिर वही बनाएंगे, आयोध्येला जाऊन गंगामातेचे पूजन केले. मंदिर वही बनाएंगे लेकीन तारीख नाही बताएंगे, पहले मंदिर बाद मे इलेक्शन त्या वेळेस त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना कुंभकर्णाची उपमा दिली. फसवी कर्जमाफी, देश का चौकीदार चोर हैं अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे सतत भाजपवर करीत होते; परंतु मांडवली कशी झाली त्याचे उत्तर जनतेला यांना द्यावेच लागणार आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.सुनील तटकरे यांनी या वेळेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरसुद्धा शरसंधान साधले, या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रभाकर उभारे, राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इकबाल धनसे आदी मान्यवर सभेसाठी उपस्थित होते.
'अनंत गीतेंना जनतेसमोर लोटांगण घालावे लागते'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:08 AM