आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडी झाली खुली , ग्रामस्थ समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:43 AM2019-02-09T03:43:45+5:302019-02-09T03:44:08+5:30
अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते.
- कांता हाबळे
नेरळ - अंगणवाडी सेविकेला अतिरिक्त भार दिल्याने ती अंगणवाडीत येत नव्हती, यामुळे अतिरिक्त भार पडल्याने मदतनीस आजारी पडल्याने ९० बालके एवढी पटसंख्या असलेली आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीला कुलूप लागले होते. तर या सगळ्याकडे एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग कर्जत बघ्याची भूमिका घेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने ही अंगणवाडी तत्काळ खुली केली आहे.
कर्जत तालुक्यातील आंत्रड तर्फे वरेडी या गावातील अंगणवाडीत सुमारे ९० बालके एवढी पटसंख्या आहे. तर १० महिलांचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत समावेश आहे. जुलै २०१८ मध्ये येथील अंगणवाडी सेविका शकुंतला डायरे या सेवानिवृत्त झाल्या, म्हणून त्या रिक्त जागेवर भारती खडे यांना अतिरिक्त भार देण्यात आला. या अंगणवाडी केंद्रावर गेल्या सहा वर्षांपासून कांचन डायरे या मदतनीस म्हणून काम पाहत आहेत. नियुक्ती झाल्यापासून खडे या अंगणवाडी केंद्रात वेळेत येत नाही व भरपूर दिवस त्या केंद्रात येतच नसल्याने कांचन डायरे यांच्यावर अतिरिक्त भर पडत होता. या अतिरिक्त भारामुळे कांचन डायरे या आजारी पडल्या. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून आंत्रड तर्फे वरेडी येथील अंगणवाडीला कुलूप लागले होते.
अंगणवाडी बंद असल्यामुळे येथील बालकांचे तर हाल झालेच आहेत; पण सोबत गावातील दहा महिलांचा अमृत आहारदेखील बंद झाला होता. दरम्यान, या सगळ्यात संबंधित प्रकरणाची माहिती असूनदेखील एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्जतने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाला खडबडून जाग आली आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, सी.ए.एन. प्रतिनिधी अशोक जंगले यांनी आंत्रड अंगणवाडीला भेट दिली. खडे या अंगणवाडी सेविकेच्या जागी शेजारील गावातील काळेवाडी येथील अंगणवाडी सेविकेला येथील चार्ज देण्यात येऊन अंगणवाडी बालकांसाठी खुली केली आहे.
केवळ ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली म्हणून ही अंगणवाडी पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. बालकांना पोषण आहाराविना इतके दिवस वंचित राहावे लागले होते. आमच्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल आम्ही आंत्रड गावकरी आभारी आहोत.
- रवींद्र डायरे,
सामाजिक कार्यकर्ते, आंत्रड