ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था, शिलालेख, स्मारकाची पडझड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:09 AM2019-05-09T02:09:30+5:302019-05-09T02:10:29+5:30
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे.
- विनोद भोईर
पाली : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. येथील स्तूप, विहार, चैत्यगृह, शिलालेख, स्मारक यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यावर अनेक उपद्रवी लोकांनी चक्क आॅइल पेंटने नावे लिहिली आहेत. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याची भीती आहे.
ठाणाळे लेणी समूहात चैत्यगृह, स्मारक,-स्तूपसमूह, सभागृह व उर्वरित २१ विहार लेणी आहे. बहुतांश विहारांमध्ये व्हरांडे आणि एक किंवा दोन खोल्या असून त्यामध्ये शयनासाठी ओटे आहेत. काही विहारांमध्ये समोरच्या भागात दालन व चार पाच भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था आहे. अशा विहारात आंतरदालन, प्रवेशद्वार, खिडकी व शयन ओटे आहेत. पाच पायऱ्या असलेल्या एका विहारात वाकाटककालीन रंगीत चित्रांचे काही अवशेष दिसतात.
प्राकृत ब्राम्ही लिपीतील शिलालेख असलेले एक पाण्याचे टाके आहे. पाण्याचे हौद, टाके, ब्राम्ही शिलालेख भित्तीचित्र आहेत. या सर्वांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. बरेच अवशेष भग्नावस्थेत आहेत. अनेक उपद्रवी लोकांनी येथील स्तूप, चैत्यगृह, स्मारक यावर चुन्याने व आॅइल पेंटने आपली नावे कोरली आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य लुप्त झाले आहे. ठाणाळे लेण्यांसारखा ऐतिहासिक व पुरातन ठेवा जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
ठाणाळे लेण्यांचा काळ हा इ.स. पूर्व दुसºया शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंत आहे. ही लेणी डोंगरामध्ये पश्चिमाभिमुख कोरलेली आहेत. लेण्यात सापडलेल्या विविध वस्तू व मौर्यकालीन चांदीची नाणी पाहता ही लेणी २२०० वर्षांपूर्वीची असल्याचे अनुमान काढण्यात येते. लेण्यांचा दगड हा अग्निजन्य (बेसाल्ट) दगड आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने अप्रतिम असलेल्या तसेच मानवी जीवनाच्या आर्थिक जडणघडणीत या लेण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ही लेणी समुद्रकिनाºयावरून चौल-धरमतर-नागोठणे खाडीमार्गे देशावर जाणारी व्यापारी केंद्रे होती असे म्हटले जाते. वाघजाई घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्गही या लेण्यांजवळून जातो. यामुळे ही लेणी चौल बंदराच्या सान्निध्याने खोदली गेली आहेत.
कोकणातून घाटमार्गे देशावर जाता-येताना विश्रांतीचे स्थान म्हणून या लेण्यांचा उपयोग केला गेला. त्याचबरोबर बौद्ध भिक्षूंच्या भदन्त, आचार्य, परित्राजक यांच्या निवाºयासाठी सुद्धा या लेण्यांचा उपयोग इ.स. ५ व्या शतकापर्यंत करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध आहे.
लेण्यांपर्यंत
कसे पोहोचाल?
पाली गावापासून ठाणाळे हे गाव १५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे या गावी येण्यासाठी नाडसुरपर्यंत एस.टी.ची सुविधा उपलब्ध आहे.
नाडसुर ते ठाणाळे हे २ कि.मी. अंतर असून तेवढेच अंतर लेण्यांकडे जाण्यासाठी चालावे लागते.
ठाणाळे गावच्या पूर्वेकडे असलेल्या जंगलामध्ये ही लेणी आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही येथे आश्रय घेतला होता.
या लेण्या अतिशय प्राचीन असून ऐतिहासिकदृष्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने वेळीच या लेण्यांची डागडुजी व देखभाल करणे गरजेचे आहे. येथे येणाºया पर्यटकांनी लेण्यांवर नावे टाकून येथील सौंदर्याला गालबोट न लावता, येथील परिसर स्वच्छ व संरक्षित कसा राहील याची दक्षता घेतली पाहिजे. शिवऋण प्रतिष्ठानतर्फे येथील परिसर साफ करून त्यासंदर्भातील लघुपटही प्रसिद्ध केला आहे, अशी माहिती शिवऋण प्रतिष्ठानकडून प्राप्त झाली.
सुधागड तालुक्याची अस्मिता असलेल्या ठाणाळे येथील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांच्या दुरवस्थेबाबत
शासन स्तरावर पाठपुरावा करून या लेण्यांच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणार.
- दिलीप रायन्नावर, तहसीलदार,
पाली-सुधागड