वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गारगाव या गावातील हद्दीत खोदकाम करताना पुरातन बांधकाम आढळले असून, हे बांधकाम मंदिर किंवा राजवाड्याचे असावे, असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला आहे. यापूर्वीही येथे कबर, गुहेचे बांधकाम आढळले होते. पुरातत्व विभागाने या भागाची पाहणी करून हे नक्की बांधकाम कसले आहे, याची खातरजमा करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गाळाचा पाडा गारगाव गावातील वाळकू शिद हे आपल्या शेतीत खोदकाम करताना रविवारी त्यांना दगडी बांधकाम आढळून आले. दगडी पाया किंवा कबर असे या बांधकामाचे स्वरूप आहे. या बांधकामापासून जवळच रामेश्वर शिवमंदिर याच भागात आहे. शिवमंदिरात दोन शिवलिंगे आहेत. मंदिराच्या पूर्वेला टेकडीवर गणपतीचे पुरातन मंदिर असून, त्याजवळ हनुमान पुत्र मकरध्वज याची मूर्ती आहे. गारगाव गावात पूर्वी जव्हारचे राजे हवापालट करण्यासाठी आपल्या हत्ती घोडे अशा फौजफाट्यासह वाडा येथे येत असत. त्यांनी वाडा शहरात व आजूबाजूच्या गावात अनेक तळी खोदली होती. वाड्याहून एक गुहा (बोगदा) थेट जव्हारच्या राजवाड्यात काढला होता असे इतिहासात नोंदी असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात.
जव्हार संस्थानाची मलवाडा ही उपशाखामलवाडा हे गारगाव याला लागूनच असल्याने पूर्वी राजांनी विश्रांतीसाठी या परिसरात छोटे महाल बांधले असावेत. त्याचेच हे अवशेष असावेत, असा एक अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. पूर्वी राजे राजवाडे असताना हे संस्थानात गाव असावे. याच टेकडीवर घरांचे अनेक उंचवटे आहेत. तीन ठिकाणी पडक्या महालाच्या खुणा आहेत. विटांचे ढिगारे असून, या विटा चौकोनी पातळ व मजबूत होत्या असे येथील ग्रामस्थांनी सांगितले, तर दुसरीकडे गणेश मंदिर, मगरध्वज मंदिर यांची पडकी मंदिरे आहेत, तर गावदेवी जरीमरी मंदिर आहे.
गारगावला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मलवाडा ही राजांची उपशाखा होती. त्यावेळी राजांनी छोटे महाल बांधले असावेत. तसेच येथे रामेश्वर हे शिवमंदिर असून, आणखी मंदिरे असावीत व हे त्याचे अवशेष असावेत. - हरिश्चंद्र पाटील, ग्रामस्थ,गारगांव