...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:03 AM2019-08-12T03:03:22+5:302019-08-12T03:04:35+5:30
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते.
- आविष्कार देसाई
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती, कारण त्यांच्यापर्यंत चारचाकी वाहन पोहोचू शकणार नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी थेट मोटारसायकलवरून अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी येथे शनिवारी पोहोचले. जिल्हाधिकारीच आल्याने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला.
वेलटवाडी हे गाव डोंगरावर असल्याने गाडी जाणार नाही हे लक्षात येताच जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मोटारसायकल आहे का अशी विचारणा केली. माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी मोटारसायकलची व्यवस्था केली. जिल्हाधिकारी हे गोंधळी यांच्याच मोटारसायकलवर बसून डोंगराकडे जाण्यास निघाले. तालुक्यातील रेकॉर्डब्रेक पावसामुळे खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. त्या वेळी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, खानावचे माजी सरपंच जितेंद्र गोंधळी, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन वस्तीवरील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे १५० नागरिकांना सुरक्षितपणे डोंगराच्या खाली खानाव गावात आणून खानाव प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह तसेच खानाव बाजार येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपदग्रस्त गावाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ, खानाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी व माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांना सुरक्षित जीवन जगता यावे याबाबत सरकारने मदत करावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी डोंगराच्या खाली नवीन गावठाण केले तर तुमची राहायची तयारी आहे का अशी विचारणा केल्यावर ग्रामस्थांनी त्यास सहमती दर्शविली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नवीन गावठाण तयार झाल्यावर पुन्हा डोंगरावर रहायला तर जाणार नाही ना असा सवालही केला, परंतु ग्रामस्थांनी पुन्हा डोंगरावर जाणार नसल्याचे सांगितले.
माझ्या जिल्ह्यातील नागरिक जीव धोक्यात घालून राहणार नाही. आपत्ती कधीच सांगून येत नाही. वेलटवाडी येथील नागरिकांना गावठाण जमीन देऊन तेथे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत पालक मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, तसेच लवकरच प्रस्ताव तयार करून यावर निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे देण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यास जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरडप्रवण क्षेत्र आहेत. याबाबत जिओग्राफिकल सर्व्हे नेमका काय आहे याची वाट पाहत आहोत. - रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड