...अन् डेक्कन क्वीन कर्जतला थांबलीच नाही; प्रवाशांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 12:38 AM2019-11-07T00:38:46+5:302019-11-07T00:39:04+5:30
नाहक त्रास : गाडीने थेट दादर स्थानक गाठल्याने नाराजी
कर्जत : घाटातील कामामुळे सकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, या मागणीचा विचार करून डेक्कन क्वीन बुधवारपासून कर्जतला थांबविली जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले; परंतु डेक्कन कर्जतला न थांबताच थेट दादर स्थानकावर थांबल्याने काही प्रवाशांना पकडले.
काहींनी वस्तुस्थिती सांगितल्यावर त्यांना सोडून देण्यात आले, त्यात वेळ वाया गेला आणि मानसिक त्रास झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त
के ला. खंडाळा घाटात मंकी हिल ते कर्जत दरम्यान रेल्वे लाइनच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द केल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलले आहेत. प्रगती एक्स्प्रेससुद्धा रद्द करण्यात आली आहे. ही गाडी रद्द आहे तोपर्यंत डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केली होती, ती मान्य करून बुधवारपासून डेक्कन क्वीन कर्जतला थांबणार होती. असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे टिष्ट्वट करण्यात आल्याने याबाबत काही उत्साही प्रवाशांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली. त्यामुळे कर्जतला उतरणारे प्रवासी या गाडीने प्रवास करीत होते; परंतु गाडी कर्जतला न थांबता थेट दादरला जाऊन थांबली. या प्रकाराने प्रवाशांना नाहक त्रास झाला. काही प्रवाशांना कर्जतपर्यंतचे तिकीट असल्याने पकडण्यात आले. त्यामध्ये त्यांचा वेळ वाया गेला आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. ही गाडी कर्जतवरून सकाळी सुमारे ९ च्या दरम्यान जाते. कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी बुधवारी सकाळी ८ वाजता माहिती घेण्यासाठी कर्जत स्थानकप्रमुखांशी संपर्क केला. त्यांनी डेक्कन क्वीन कर्जतला थांबण्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना नसल्याचे सांगितले. यावरून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.