...अन् त्या विद्यार्थिनीचे सुदैवाने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:09 AM2018-10-04T05:09:44+5:302018-10-04T05:10:15+5:30
कर्जतमधील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये शिकत असलेली एक विद्यार्थिनी खोपोलीहून महाविद्यालयात येण्यासाठी निघाली
कर्जत : कर्जतमधील कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये शिकत असलेली एक विद्यार्थिनी खोपोलीहून महाविद्यालयात येण्यासाठी निघाली. खोपोली ट्रेन ७ वाजून २० मिनिटांनी असते. ट्रेन सुटली आणि त्याच वेळी ती फलाटावर आली आणि धावत येऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना तिचा ट्रेनच्या दांड्याला धरत असलेला हात सटकला आणि ती पडण्याच्या बेतात असताना त्याच महाविद्यालयात झेरॉक्स आॅपरेटर म्हणून काम करीत असलेल्या सुलभा विद्याधर पाटील या किंचाळल्या आणि तिचा हात पकडला, त्यामुळे त्या विद्यार्थिनीचे प्राण वाचले आणि भयंकर दुर्घटना टाळली.
प्रतीक्षा प्रकाश मोरे (१८) ही विद्यार्थिनी राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षामध्ये शिकते. बुधवारी तिचे प्रॅक्टिकल असल्यामुळे तिला महाविद्यालयात येणे आवश्यक होते. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सुटणाऱ्या खोपोली-कर्जत ट्रेनने ती नेहमीच येत असते. मात्र, आज गाडी सुटली तरी ती आली नाही आणि गाडी सुटताच, ती फलाटावर आली आणि चालती गाडी धरण्यासाठी तिने डब्यातील दरवाजाचा दांडा धरण्याचा प्रयत्न केला; परंतु तिचा हात सटकला. त्याच वेळी सुलभा विद्याधर पाटील यांनी प्रसंगावधान दाखवून तिचा हात पकडला. त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका विद्यार्थिनीनेही मदत केली, त्यामुळे प्रतीक्षा वाचली. विशेष म्हणजे, सुलभा पाटील निर्माल्य टाकण्यासाठी पुढे आल्यामुळे त्या दरवाजात होत्या आणि त्यांनी प्रसंगावधान राखून एका विद्यार्थिनीचे प्राण वाचविले.