मधुकर ठाकूर
उरण : जाळी दूरुस्तीच्या शिलाईसाठी स्थानिक कामगार महागडे तरीही अपुरे पडत असल्याने आता मच्छीमारांवर आंध्रप्रदेशातील कामगारांना बोलाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. करंजा बंदरात दररोज जाळी शिलाईच्याच कामासाठी सुमारे ४०० कामगार आले आहेत. ते १३ तास काम करीत असल्याचे करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष रमेश नाखवा यांनी सांगितले.
पावसाळी मासेमारी बंदीच्या ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात होणार असली तरी पर्ससीन नेट फिशिंग १५ ऑगस्ट नंतरच सुरू करण्याचा निर्णय पर्ससीन मच्छीमार असोसिएशनने बैठकीनंतर जाहीर केला आहे. १५ ऑगस्टनंतरच सुरू होणार असल्याने पर्ससीन नेट फिशिंगसाठी येथील मोरा, करंजा बंदरात मच्छीमारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मासेमारीसाठी निघण्याच्या आधी बोटींची डागडूजी बरोबरच जाळीची दुरुस्ती आवश्यक असते. मात्र मोठ्या प्रमाणावर जाळीत शिलाईच्या कामासाठी स्थानिक कामगार महागडे तसेच अपुरे पडतात.
आठ तासांच्या कामासाठी स्थानिक कामगारांना ८०० रुपये मोजावे लागतात.त्याशिवाय जेवण, चहापाणी, नाष्ट्यासाठीही अतिरिक्त पैसे खर्च होतात.त्याशिवाय कामेही वेळेवर होत नाहीत.जाळी शिलाईची कामे कमी खर्चात आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी आंध्रप्रदेशातील कामगारांना बोलाविण्यास सुरुवात केली आहे.१२०० रुपयांत १३ तास अविरतपणे काम करतात.जेवण, चहापाणी, नाष्टा बनविण्याची जबाबदारी कामगारांपैकीच एका कामगाराकडे सोपवली जाते.यामुळे वेळ अतिरिक्त खर्चाचीही बचत होते.
पर्ससीन नेट फिशिंगसाठी हाताळणी करण्यास व समुद्रातुन उचलण्यासाठी सुलभ जाते म्हणून १० ते ११ लांबीचे एक असे जाळींचे ७० ते ८० भाग केले जातात.हे भाग जोडण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.जाळी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगण्यासाठी फ्लोटचा वापर करावा लागतो.एका फ्लोटची किंमत २५ रुपये आहे.असे १५००० फ्लोटची आवश्यकता भासते.जाळी पाण्याखाली ठेवण्यासाठी शिश्याचा वापर केला जातो.शिसे प्रतिकिलो २१५ किलो दराने खरेदी करावे लागते. एका बोटीतील ७०-८० जाळींच्या भागासाठी साडेतीन टन शिसे लागते.
एका ट्रिपसाठी डिझेल दोन हजार लिटर , ऑईल - १०० लिटर,१५ टन बर्फ,किराणा सामान ३० हजार रुपये,२० लिटर्सचे बिसलेरी पाण्याच्या २५ बॉटल, आदी सुमारे तीन लाखांचे सामान लागते. बोटीवर १६ ते १८ खलाशी असतात. रत्नागिरी, गुहागर येथील खलाशी कामासाठी येतात. मासळी विक्री नंतर मिळालेल्या पैशातून खर्च वगळता ५०-५० टक्के प्रमाणे मालक व खलाशांमध्ये समान वाटप केले जाते.
दरवर्षी रंगरंगोटी, दुरुस्तीवरच अडीच लाखांहून अधिक रक्कम खर्च करावी लागते. पर्ससीन नेट फिशिंगवर शासनाने बंदी घातली आहे. २०१२ पासून तर लायसन्स देणे बंद केले आहे. जुनी लायसन्सनही नुतनीकरण केली जात नाही. त्यामुळे परवानाधारक मच्छीमार बोटी ऑगस्ट ते नोव्हेंबर असे चार महिने राज्याच्या सागरी हद्दीबाहेर १२ नॉटिकल सागरी मैलावर जाऊन मासेमारी करतात. १२ नॉटिकल सागरी मैलाबाहेर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सागरी हद्दीत मासेमारी करण्यास मुभा आहे.
एक जुनपासुन शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीनंतर ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासुन मासेमारीला सुरुवात होणार आहे.पर्सियन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. सुरु होणार्या मासेमारीच्या पुर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससुनडॉक बंदरात आतापासूनच हजारो मच्छीमार बोटींची लगबग सुरु झाली आहे.
समुद्रातील पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील १ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुनच खवळलेला समुद्र शांत होतो.निरव शांत झालेल्या सागरात पर्ससीन नेट फिशिंगसाठी पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्ससीन फिशिंग या दोन प्रकारातील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात.समुद्राच्या पुष्ठभागावरील ४ ते ५ कि.मी. परिघातील परिसरात ३५ ते ४० वाव खोलीपर्यत पर्सियन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जातात. गोळाकार सर्कल सिल केल्यानंतर समुद्राच्या पुष्ठभागावरील विविध प्रकारातील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय,शिंगाला,तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी समुद्राच्या पुष्ठभागावरील तरंगती मासळी पकडली जाते.
खोल समुद्रातील मासेमारीसाठीही ससूनडॉक, कसारा, मोरा-करंजा बंदरात शेकडो मच्छीमारी ट्रॉलर्स सज्ज होऊ लागले आहेत. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी सव्वा ते दीड लाखापर्यत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.
पावसाळी बंदीनंतर दहा दिवसात मासेमारीला सुरुवात होणार आहे.यामुळे विविध बंदरात मच्छीमारांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मच्छीमार नौकांची यांत्रिक दुरुस्ती, रंगरंगोटी, जाळी आदी तत्सम कामांसाठी हजारो मच्छीमारांची विविध बंदरात लगबग सुरू झाली आहे. १ ऑगस्ट पासूनच मच्छीमार बोटींना डिझेलचा कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिझेल भरण्यासाठी मच्छीमार बोटींची कसारा आणि ससुनडॉक बंदरात हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. डिझेल,आवश्यक साधन-सामग्री उपलब्ध होताच तात्काळ हजारो मच्छीमार बोटी १ ऑगस्टपासून मासेमारीसाठी रवाना होणार आहेत. मासेमारीला सुरुवात होताच १०-१५ दिवसात मासळीची आवक वाढणार आहे. त्यामुळे पावसाळी बंदीनंतर मासळीचे वाढलेले भाव आटोक्यात येणार आहेत. खवय्यांनाही बाजारात विपुल प्रमाणात मासळी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खवय्यांनाही मासेमारी सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.