अंगणवाडी भरते सेविकेच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:03 AM2018-08-11T02:03:17+5:302018-08-11T02:03:23+5:30
नेरळ परिसरातील कोलीवली येथील अंगणवाडी रस्त्याबरोबरच मूलभूत सोयीसुविधांअभावी सेविकेच्या घरात भरवली जात आहे.
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ परिसरातील कोलीवली येथील अंगणवाडी रस्त्याबरोबरच मूलभूत सोयीसुविधांअभावी सेविकेच्या घरात भरवली जात आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही वाकस ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलीवली अंगणवाडीची स्थापना २००६ साली करण्यात आली. तेव्हापासून ती अंगणवाडी सेविकेच्या घरात भरवली जात आहे. त्या वेळी त्यांना घराचे भाडे दिले जात होते; परंतु २०१०-११ मध्ये महिला व बालकल्याण विभाग रायगड व जिल्हा परिषदेकडून नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ४ लाख रु पये खर्च करून सुसज्ज इमारत कोलीवली गावाबाहेर बांधण्यात आली आहे. अंगणवाडीत सध्या २५ बालके आहेत; परंतु रस्त्याअभावी पावसाळ्यात ही अंगणवाडी सेविकेचा घरातच भरवली जात आहे. अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात आल्याने आता घरमालकाला भाडे देणेही बंद करण्यात आले आहे.
आतापर्यंत अनेक वेळा अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास यांच्याकडे रस्त्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी सुरक्षा भिंत नाही, अन्न शिजवण्यासाठी कोणतेही साहित्य नाही की स्वतंत्र जागा नाही. या ठिकाणी वीजही नाही. शिवाय पावसाळ्यात आजूबाजूला झाडीझुडपे वाढल्याने सर्पदंश, विंचूदंशाची शक्यता नाकारता येत नाही.
दोन वर्षांपूर्वी ग्रामनिधीच्या १० टक्के निधीतून एक कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यानंतर पायरी व खिडकीची दुरु स्ती आणि साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे; परंतु अद्याप ग्रामपंचायतही दखल घेत नाही. अंगणवाडीत जाण्यासाठी रस्ता, पिण्यासाठी शुद्ध पाणी, लाइट, अंगणवाडीभोवती संरक्षक भिंत अशा सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी अंगणवाडी सेविका आणि पालकांनी केली आहे.
>रस्त्याअभावी पावसाळ्यात अंगणवाडी घरात भरविल्याशिवाय पर्याय नाही. अनेक वेळा वाकस ग्रामपंचायत आणि एकात्मिक बालविकास कर्जत यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. तसेच अंगणवाडीची पायरी व खिडक्या दुरु स्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. दोन वर्षांपूर्वी अंगणवाडीला ग्रामपंचायतीने १० टक्के निधीतून कचराकुंडी दिली आहे. त्यानंतर काहीही देण्यात आले नाही; परंतु अंगणवाडीमध्ये लाइट, पाणी, जेवणासाठी शेगडी अशा अडचणी आहेत.
- रेश्मा कोळंबे,
अंगणवाडी सेविका,
कोलीवली
>कोलीवली अंगणवाडीत जाण्यासाठी जो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यासाठी चार वर्षांपूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न केले होते; परंतु काही अडचणी आल्या होत्या. येत्या दिवाळीनंतर रस्ता तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून रस्ता चांगल्या दर्जाचा करू.
- संजय तांबोळी,
विद्यमान सदस्य,
वाकस ग्रामपंचायत
>अंगणवाडीकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून या रस्त्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले नाहीत; परंतु कोलीवली अंगणवाडीला जेवण शिजवण्यासाठी शेगडी देण्यात येणार आहे व १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून दुरु स्ती करण्यात येणार आहे, असे मासिक सभेत ठरले आहे.
- दिगंबर बागुल,
ग्रामसेवक, वाकस ग्रामपंचायत