अंगणवाडी सेविका गायब : आंत्रड तर्फे वरेडी अंगणवाडी आठ दिवसांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:11 AM2019-02-08T03:11:43+5:302019-02-08T03:12:11+5:30

आदिवासीबहुल भाग असलेल्या कर्जत तालुक्यात मागील वर्षी कुपोषणाने दोन बळी गेले. त्यामुळे कुपोषण विषयात रायगड जिल्हा संवेदनशील झाला.

Anganwadi worker disappeared: Antrad Anganwadi has been closed since eight days | अंगणवाडी सेविका गायब : आंत्रड तर्फे वरेडी अंगणवाडी आठ दिवसांपासून बंद

अंगणवाडी सेविका गायब : आंत्रड तर्फे वरेडी अंगणवाडी आठ दिवसांपासून बंद

googlenewsNext

- कांता हाबळे
नेरळ : आदिवासीबहुल भाग असलेल्या कर्जत तालुक्यात मागील वर्षी कुपोषणाने दोन बळी गेले. त्यामुळे कुपोषण विषयात रायगड जिल्हा संवेदनशील झाला. शासकीय यंत्रणा कर्जत तालुक्यात सजग झाल्याचे चित्र होते. मात्र, आता ही यंत्रणा तालुक्यात सुस्तावली असल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील आंत्रड तर्फे वरेडी या गावात गेल्या आठ दिवसांपासून अंगणवाडी बंद आहे. अंगणवाडी सेविका येत नसल्याने अतिरिक्त भार पडून मदतनीस आजारी पडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्जत याबाबतीत बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यात ३६० अंगणवाडी केंद्र आहेत. त्यातील आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडी केंद्रात सुमारे ९० बालकांची पटसंख्या आहे, तर दहा महिलांचा अमृत आहार योजनेत समावेश आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात येथील अंगणवाडी सेविका शकुंतला डायरे या सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर रिक्त जागेवर भारती खडे यांना अतिरिक्त भार देण्यात आला. या अंगणवाडी केंद्रावर गेल्या सहा वर्षांपासून कांचन डायरे या मदतनीस म्हणून काम पाहत आहेत. नियुक्ती झाल्यापासून खडे या अंगणवाडी केंद्रात वेळेत येत नाहीत. अनेक दिवस त्या केंद्रात येतच नसल्याने कांचन डायरे यांच्यावर अतिरिक्त भर पडत होता. या अतिरिक्त भारामुळे डायरे या आजारी पडल्या आहेत. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून आंत्रडतर्फे वरेडी येथील अंगणवाडीला कुलूप लागले आहे.

अंगणवाडी बंद असल्यामुळे येथील बालकांचे तर हाल झाले आहे; पण सोबत गावातील दहा महिलांचा अमृत आहारदेखील बंद झाला आहे. दरम्यान, या सगळ्या संबंधित प्रकरणाची माहिती असूनदेखील एकात्मिक बालविकास प्रकल्प कर्जतने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कुपोषण निर्मूलनासाठी शासन एक मोठा लढा उभा करत असताना ९० बालके एवढी मोठी पटसंख्या असलेल्या आंत्रड तर्फे वरेडी अंगणवाडीला अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे टाळे लागले आहे.

भारती खडे यांना आंत्रड तर्फे वरेडी या अंगणवाडीवर अतिरिक्त भार देण्यात आला होता. या अंगणवाडीवर खडे आणि ग्रामस्थ यांच्यात काहीतरी वाद झाल्याचे त्यांनी प्रकल्प कार्यालयात लेखी कळवले होते. अंगणवाडी आठ दिवस बंद असल्याचे मला माहीत आहे, उद्या प्रत्यक्ष जागेवर मी भेट देणार आहे.
- दत्ता प्रल्हाद वाघमारे, बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्जत

गेले आठ दिवस अंगणवाडी बंद आहे, याचा गावातील सुमारे ९० बालकांना फटका बसत आहे. अंगणवाडी सेविका येत नसल्याने अतिरिक्त भार असून मदतनीसही आजारी पडली आहे. बालकांचे वजन घेण्यास कोणाला वेळ नाही. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत ही अंगणवाडी सापडली असून, हे प्रश्न लवकर निकाली न निघाल्यास कर्जत बालविकास प्रकल्प कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल.
- रवींद्र डायरे, सामाजिक कार्यकर्ते, आंत्रड

Web Title: Anganwadi worker disappeared: Antrad Anganwadi has been closed since eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड