कळंबाेली : संपूर्ण राज्यात अंगणवाडीचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज, नेट पॅक मारण्यासाठी सेविकांना या अगोदर ४०० रुपयांचा भत्ता दिला जात होता. त्यात वाढ करत मार्चपासून ६०० रुपये दिला जाणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ३२७ जणींना याचा लाभ होणार आहे. यासाठी दोन लाख २६ हजार ८०० रुपयांची रक्कम लवकरच खात्यावर जमा होणार असल्याने अंगणवाडीताईंना दिलासा मिळाला आहे.
पनवेल तालुक्यात ३६३ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ३७ हजार ३२२ लाभार्थी आहेत. त्यांचा आहार वितरित करण्यापासून ते पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. अंगणवाडी कामकाजासाठी त्यांना मोबाइल देण्यात आले आहेत. मोबाइल रिचार्ज , नेट पॅकसाठी तीन महिन्याच्या अगोदर ४०० रुपयांप्रमाणे भत्ता दिला जात होता.
महागाईमुळे हा भत्ता परवडणारा नव्हता. कित्येकदा नेट पॅक आणि रिचार्जसाठी खिशातील पैसे घालावे लागत असत. त्यामुळे अंगणवाडीताईंची वाढीव भत्त्यासाठी मागणी होती. राज्य महिला व बालकल्याण विभागाने दखल घेत २०० रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार पनवेल तालुक्यातील ३२७ जणींना मार्च ते मेपर्यंतच्या तीन महिन्याच्या कालावधीसाठी ६०० रुपयेप्रमाणे दोन लाख २६ हजार ८०० रुपये मिळणार आहेत.
यासाठी होतो मोबाइलचा वापर मोबाइलच्या माध्यमातून रोजचा आहार, बालकांची निरीक्षण, स्वाध्याय, हजेरी पट, बालकांचे वजन, गरोदर मातांचे वजन, महिलांच्या आरोग्य तपासणीची माहिती देणे, बाळंतपणाच्या तारखा दाखल करणे, लाभार्थींच्या घरी भेटी देणे, त्यांची माहिती भरणे आदी कामे करावी लागतात. सध्या अंगणवाड्या बंद असल्या तरीदेखील इतर कामाच्या नोंदी या मोबाइलवर देण्यात येत असल्याने कामाला गती आली आहे.
अंगणवाडी सेविकांना तीन महिन्याचा भत्ता महिन्याच्या सुरुवातीलाच दिला जातो. यावेळी वाढीव भत्ता येणार असल्याने या महिन्यात उशीर झाला आहे. पण ३१ मार्चपर्यंत वाढीव भत्ता ६०० प्रमाणे खात्यावर जमा होईल. चेतन गायकवाड, प्रकल्प अधिकारी, पनवेल