अंगणवाड्यांची दुरुस्ती जिल्ह्यात प्रगतिपथावर, ५२४ इमारतींची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:21 AM2019-02-19T03:21:41+5:302019-02-19T03:22:03+5:30
५२४ इमारतींची दुरवस्था : १३५ कामे पूर्ण; प्रत्यक्षात १७९ कामे सुरू
आविष्कार देसाई
अलिबाग : खासगी शाळांमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी असे विभाग सुरू केल्याने बहुतांश पालक आपल्या पाल्याला याच ठिकाणी शालेय संस्कार देण्याचा प्रयत्न करतात, मात्र ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी अशा शाळांची फी परवडणारी नाही. यासाठी सरकारमार्फत अंगणवाडी केंद्र सुरू करून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला जात आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील ५२४ अंगणवाड्यांची दुरवस्था झाल्याने तेथील इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यातील प्रत्यक्षात १७९ कामे सुरू आहेत, तर १३५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील लहान मुलांना शाळेची गोडी लागावी, तसेच शालेय संस्कार होण्यासाठी अंगणवाड्यांची गरज निर्माण झाली होती. सरकार ती पूर्ण करत असली, तरी काही अंगणवाड्यांमधील पदे रिक्त असल्याने ती तातडीने भरणे गरजेचे आहे. अंगणवाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. त्यामाध्यमातून तेथे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी पोषण आहार, शालेय पुस्तके, गणवेश, इमारती यांच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांकडे सरकारसह स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे अंगणवाड्यांच्या इमारती पाहिल्यावर दिसून येते, काही धोकादायक झालेल्या इमारती पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये लहान मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषदेने तातडीने ५२४ पडझड झालेल्या अंगणवाड्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत. ५२४ पैकी १७९ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत, तर १३५ ठिकाणची कामे पूर्णही झाली आहेत. उर्वरित अंगणवाड्यांच्या इमारतींची दुरुस्ती मार्चअखेरपर्यंत करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा परिषदेकडून बांधकाम
च्ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी अंगणवाडीसाठी चांगल्या दर्जाच्या इमारती नव्याने उभारण्यात येत आहेत. रायगड जिल्हा परिषदेकडून २०१७-१८ आणि २०१८-१९ या कालावधीतील तब्बल १०१ नव्याने अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. पैकी ३६ ठिकाणी कामे सुरू झाली आहेत, तर ११ अंगणवाड्यांच्या इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत.
च्अंगणवाड्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे, तसेच खासगी ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत तेथील मालकांना दुरुस्ती करण्याबाबत सूचना वेळोवेळी करण्यात येत असल्याचेही महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी स्पष्ट केले.