जयंत धुळप, अलिबागमहाड तालुक्यातील बिरवाडीतील गणराज जैन गेल्या दहा वर्षांपासून सर्प आणि प्राणिमित्र म्हणून कार्यरत आहेत. महाड-पोलादपूरमध्ये २००५ ला आलेल्या महाप्रलयाच्या वेळी सर्वत्र पुराचे पाणी आल्यावर माणसाने आपले प्राण वाचविण्याकरिता सारे प्रयत्न केले. मात्र या पुराच्या पाण्यात साप, कुत्रा, मांजर यासारख्या प्राण्यांची झालेली गंभीर अवस्था आणि त्यांचे मृत्यू पाहून गणराज जैन यांच्यातील प्राणिमित्र खऱ्या अर्थाने जागा झाला. त्यांनी त्यावेळी अनेक साप आणि मुक्या प्राण्यांना आपल्या घरी आणून त्यांना वाचवण्याचे मोठे काम केले. गेल्या १० वर्षांत तब्बल तीन हजार सापांना त्यांनी जीवदान दिले. या दरम्यान त्यांना तीन वेळा सर्पदंश देखील झाला, परंतु ते आपल्या ध्येयापासून दूर झाले नाहीत. आतापर्यंत त्यांनी कुत्रा, मांजर, गाय, बैल अशा विविध चार हजार मुक्या प्राण्यांना जीवदान दिले.२००७ मध्ये त्यांच्या या प्राणिसेवेच्या व्रतात सहभागी होण्याच्या हेतूने डॉ. अर्चना देशमुख-जैन या त्यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्या. २ सप्टेंबर २०१३ ला अत्यंत दुर्धर प्रसंग या दाम्पत्यावर ओढावला. कोब्रा जातीच्या सापाला पकडून जंगलात सोडण्याच्या प्रयत्नात गणराज असताना कोब्राने दंश केला. यावेळी मृत्यूशी सात दिवसांची लढाई केल्यावर ते शुद्धीवर आले. या प्रसंगानंतर सर्वांना वाटले गणराजचे हे सर्प आणि प्राणिमित्र पे्रम संपुष्टात येईल, मात्र याउलट घडले. ‘सर्प संरक्षण आणि संवर्धनाकरिताच मी समर्पित आहे’, अशी भूमिका गणराज यांनी घेतले. २०१३ मधील या प्रसंगानंतर गणराज यांनी तब्बल ८०० सापांना जीवदान दिले. सापाला मारू नका, मला सांगा, मी त्याला त्याच्या जागी पोहोचवीन, अशी जनजागृती करीत त्यांचे काम सुरू आहे.
मुक्या प्राण्यांना जीवदान देणारे देवदूत
By admin | Published: August 18, 2015 11:30 PM