मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात संताप, गायरान जागा सोडून शेतकऱ्यांच्या सुपीक जागेचे भूसंपादन
By वैभव गायकर | Published: August 28, 2023 05:45 PM2023-08-28T17:45:19+5:302023-08-28T17:46:40+5:30
चिंध्रन गावात शासनाची सुमारे 15 ते 16 एकर गायरान जागा आहे.
पनवेल - पनवेल तालुक्यात येणाऱ्या मुंबई ऊर्जा प्रकल्पाविरोधात याठिकाणचे स्थानक आक्रमक झाले आहेत.याबाबत चिंध्रन येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात उपोषणाचा हत्यार उगारला असुन जाणीवपुर्वक शेतकऱ्यांच्या सुपीक जागेतुन या प्रकल्पाचे उच्च दाबाचे टॉवर बांधले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दि. 28 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमरण उपोषणाचा हत्यार उगारला आहे.
चिंध्रन गावात शासनाची सुमारे 15 ते 16 एकर गायरान जागा आहे. सर्व्हे नंबर 31 मध्ये हि गायरान जागा आहे.मात्र असे असताना या प्रकल्पाकरिता गावातील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या सुपीक जागेतून या प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार आहे.याबाबत शेतकऱ्यांनी आपला वेळोवेळी विरोध दर्शविला आहे.मात्र केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने पोलीस बलाचा वापर करून इतर शासकीय यंत्रणा कामाला लावुन शेतकऱ्यांच्या जागेचे जबरदस्तीने भूसंपादन केले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किरण कडू यांनी केला आहे.चिंध्रन गावाचे मागील 75 वर्षापासून गावठाण विस्तार झालेले नाही.
गावात एकुण 968 घरे आहेत.यापैकी 800 घरे गावठाणाच्या बाहेर असल्याने हि घरे अनधिकृत ठरविण्याची भीती चिंध्रन ग्रामस्थांना वाटत असल्याने तत्काळ गावाचा गावठाण विस्तार करावा या मागणीसाठी 13 ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.यामध्ये किरण कडू,सुजित पाटील,मनोज कुंभारकर,राम पाटील,विलास पाटील,मधुकर पाटील,शैलेश अरिवले,जयराम कडू,रुपेश मुंबईकर,बामा भंडारी,गणेश देशेकर,संतोष अरिवले,ताईबाई कडू आणि समीर पारधी असे 13 जण उपोषणाला बसले आहेत.