उरण येथील महाराष्ट्र बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 05:51 PM2024-04-16T17:51:30+5:302024-04-16T17:51:47+5:30
अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.
मधुकर ठाकूर, उरण : उरण शहरातील सर्वात जुनी असलेली महाराष्ट्र बॅक आनंदनगर येथील अपुऱ्या जागेत स्थलांतर करण्यात आली आहे.यामुळे अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने बॅकेच्या गळथान कारभाराबाबत ग्राहकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र बॅकेची शाखा उरण शहरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यरत होती.काही महिन्यांपूर्वी ही बॅक आनंद नगर येथील एका इमारतीत हलविण्यात आली आहे.२० फुटी बाय १५ फुट चौरस फुट जागेत स्थलांतरित करण्यात आलेल्या अपुऱ्या जागेमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
एकाच काउंटरवरुन या बॅकेचे काम सुरू झाले आहे.
सुमारे सेवानिवृत्त ३००० कर्मचाऱ्यांची याच बॅकेत खाती आहेत.मात्र बॅकेत आबालवृद्धांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते.एटीएमची व्यवस्था असली तरी अधुनमधून तीनतीन-चारचार दिवस मशिनमध्ये रोख रक्कम उपलब्ध नसते.ग्राहकांना भेडसावणाऱ्या गैरसोयी व विविध समस्यांमुळे अनेक ग्राहकांनी आपली खाती दुसऱ्या बॅकेत हलविली आहेत.त्यामुळे ग्राहकांच्या हितासाठी बॅकेने कर्मचारी संख्येत वाढ करावी, ग्राहकांना भेडसावणाऱ्या गैरसोयी, समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी ग्राहक ॲड.दत्तात्रेय नवाळे यांनी उरण शाखा व्यवस्थापक व वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
सेवानिवृत्त आबालवृद्ध ग्राहकांना पहिल्या मजल्यावर असलेल्या जुन्या बॅकेत चढ उतार करणे कठीण होतं होते.त्यामुळेच ग्राहकांच्या सोयीसाठी शाखा इतर ठिकाणच्या तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहे.स्थलांतरित करण्यात आलेली शाखा नियमानुसार जागेत आहे.कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असली तरी कर्मचारी वाढविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होईल.एटीएममध्ये रोख रक्कम ठेवण्यासाठी मुख्यालयाने एजन्सीची नेमणूक केली आहे.पैसे संपल्यानंतर संदेश प्राप्त होताच एजन्सी मार्फत एटीएममध्ये रोख रक्कम भरली जाते. ग्राहकांच्या गैरसोयी दूर करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती उरण महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती मृणालिनी गजबे यांनी दिली.