विजय मांडे कर्जत : कर्जत नगर परिषद हद्दीत मुख्य रस्त्यावरील मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालयदरम्यानचे काम शहरातील अनेक रस्ते झाले तरी अद्याप रखडले आहे. शहराच्या विकास आराखड्यात हा रस्ता नऊ मीटर लांबीचा आहे. मात्र नगर परिषदेच्या अभियंत्यांनी तो सात मीटरवर आणला आहे. अरुंद रस्त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. नगर परिषदेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, पालिका पुन्हा विकास आराखड्याप्रमाणे नऊ मीटरचा रस्ता करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेकडून संबंधित रस्त्याचे काम करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी, नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर नवीन मुख्याधिकारी रुजू झाले असून, त्याच कालावधीत मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्याचे आरसीसी काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने ठेकेदार कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार ठेकेदाराने रस्त्यासाठी खोदकामही सुरू केले. मात्र हा रस्ता अरुंद केला जाणार असल्याचा संशय स्थानिकांना वाटू लागला. त्यांनी कर्जत नगर परिषदेचे नगर अभियंता मनीष गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित रस्ता सात मीटर रुंदीचा होत असल्याचे सांगितले. याबाबत काही दिवसांपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांची भेट घेतली. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन हे काम ईस्टीमेंटप्रमाणेच व्हावे आणि त्याप्रमाणे रस्त्याचे काम केले जात नाही तोपर्यंत खोदून ठेवलेला रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून या प्रकरणी निर्णय घेतो, असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन हवेतच विरल्याची जाणीव होत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना झाली आहे.मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप या खणलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिलेले नाहीत. तसेच रस्त्याची पाहणीदेखील केलेली नाही. मात्र संतप्त नागरिकांनी रस्त्याचे काम थांबविले आहे.कर्जत शहरात मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय या मुख्य रस्त्याचे काम सुरू झाले आहे. स्थानिक नागरिक आणि भाजपने रस्त्याच्या रुंदीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक तपासण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विकास आराखड्याची माहिती घेऊन निर्णय घेऊ. - पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जतकर्जत शहरात सर्व रस्ते झाले, पण मावकर हॉटेल ते नगर परिषद कार्यालय हा रस्ता अद्याप झाला नाही. नऊ मीटर रुंदीचा रस्ता सात मीटर करण्यासाठी काम अपूर्णावस्थेत ठेवण्यात आले आहे. विकास आराखड्याप्रमाणेच काम झाले पाहिजे. - रमाकांत जाधव, भाजप संपर्क प्रमुख