आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 12:25 PM2024-06-02T12:25:06+5:302024-06-02T12:25:36+5:30
अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे.
अलिबाग : स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे अलिबाग शहरात समाधीस्थळ आहे. आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसराचे सुशोभीकरण काम अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू होते. या कामाबाबत पुरातत्त्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे काम थांबवले आहे. अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे.
२१ जानेवारीला राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, आ. महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला होता. संरक्षक भिंत आणि आरमारी नौकेची प्रतिकृती उभारणीचे काम हाती घेतले होते. प्रादेशिक पर्यटन योजनेतून दोन कोटी सुशोभीकरण कामासाठी मंजूर झाले आहेत. अजून तीन कोटी निधीची गरज असून, पाच कोटी रुपये खर्च होणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने आंग्रे समाधी स्थळ दुर्लक्षित
अलिबाग हा पर्यटनासाठी उत्तम तालुका आहे. मात्र, अलिबागमध्ये येणारे बहुतांश पर्यटक हे समुद्र पर्यटन करून माघारी फिरतात. मात्र सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाला भेट देत नाहीत.
त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. आंग्रे समाधी स्थळालाही पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, यासाठी परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याला पुरातत्व विभागाने खोडा घातला आहे.
ही कामे होती सुरू
समाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दीपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे यासाठी लागणारी आवश्यक बांधकामे ही कामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. जानेवारीत या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, तांत्रिक मान्यताही प्राप्त झाल्या. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर आंग्रे समाधी स्थळाकडे पर्यटकही आकर्षित होतील. मात्र पुरातत्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्याने हे काम थांबविले आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभीकरण काम सुरू झाले होते. पुरातत्व विभागाने काही कामांच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे काम थांबले आहे. पुरातत्व विभागाच्या शंकाचे निरसन केले जात आहे. लवकरच काम पुन्हा सुरू होईल.
-अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद